बारा वर्षांचा मुलगा बिबटय़ाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना शुक्रवारी आरे वसाहतीत घडली. प्रकाश साळुंके असे या मुलाचे नाव आहे. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी अशाच एका हल्ल्यात चार वर्षांच्या चिमुरडीचा अंत झाला होता.
सहावीत शिकणारा प्रकाश   शुक्रवारी सायंकाळी शाळा सुटल्यावर घरी परतत होता. वसाहतीतील मटाईपाडा येथील गेट क्रमांक २५ समोरून जात असतानाच बाजूच्या झाडीतून बिबटय़ाने त्याच्यावर अचानक हल्ला केला. त्यात प्रकाश जबर जखमी झाला. तेथून जात असलेल्या लहू जाधव यांनी जखमी प्रकाशला पाहिले. प्रकाशची आई लक्ष्मी साळुंके व इतरांच्या साथीने प्रकाशला तातडीने भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच प्रकाश मरण पावला होता असे आरे वसाहत पोलिसांनी सांगितले. १ऑक्टोबरला बिबटय़ाच्या हल्ल्यात एका चार वर्षांच्या चिमुरडीचा अंत झाला होता.

Story img Loader