मुंबई : बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी शुक्रवारी येथे केली. त्यांनी या उद्यानातील दोन सिंह वर्षभरासाठी दत्तकही घेतले आहेत. शुक्रवारी त्यांनी उद्यानाचा पाहणी दौरा केला. बिबट्यांच्या सफारीसाठी सुमारे ३० हेक्टर जागा लागणार असून ही जागा या क्षेत्रात उपलब्ध आहे. तर सफारी प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

उद्यानामध्ये सध्या वाघ व सिंहाच्या दोन सफारी उपलब्ध आहेत. या राष्ट्रीय उद्यानाला वर्षभरात २० लाख पर्यटक भेट देतात. जर बिबट्याची सफारी उपलब्ध झाली, तर पर्यटकांची संख्या वाढेल व त्यातून वनक्षेत्राचे उत्पन्न वाढेल, अशी माहिती देऊन मुख्य वनसंरक्षक मल्लिकार्जुन यांनी मंत्र्यांसमोर सादरीकरण केले. याबाबत आढावा घेतल्यानंतर शेलार यांनी बिबट्याची सफारी करण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी लागणारा निधी वन खात्याकडून व जिल्हा नियोजन समितीमधून दिला जाईल, असे त्यांनी नमूद केले. निधीबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी उपनगराचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुख्य वनसंरक्षक श्रीजी मल्लिकार्जुन, उपसंचालक रेवती कुलकर्णी, सहायक वनरक्षक सुधीर सोनवणे, मुख्य सुरक्षा अधिकारी योगेश महाजन आदी उपस्थित होते.

वनमजुरांसाठी विमा

उद्यानात ४०० वनमजूर असून ते स्वत:चा जीव धोक्यात घालून सतत गस्तीचे काम करतात. या सर्वांचा विमा उतरविण्याचे व त्यासाठी निधी देण्याचे आदेश शेलार यांनी या वेळी दिले.

दोन सिंह दत्तक

उद्यानात ‘भारत आणि भारती’ हे तीन वर्षांचे दोन सिंह नुकतेच २६ जानेवारीला गुजरातमधून आणण्यात आले आहेत. त्यांना वर्षभरासाठी शेलार यांनी दत्तक घेतले असून त्यांच्या पालनपोषणासाठी होणारा खर्च ते वैयक्तिकरीत्या करणार आहेत.

Story img Loader