संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘बिबटय़ा सफारी’चा उपक्रम पर्यावरणाच्या मुद्दय़ावरून मागे पडला असून उद्यान व्यवस्थापनाला आता ‘बिबटय़ा सफारी’साठी नवी क्लृप्ती लढवावी लागणार आहे. सध्या उद्यानात ‘बिबटय़ा सफारी’ करावी लागल्यास मोठय़ा प्रमाणावर वृक्षांची कत्तल करावी लागणार असून त्याने पर्यावरणाची मोठी हानी होईल. त्यामुळे सफारीसाठी अन्य मार्गाचा विचार करत असल्याचे उद्यानातील  अधिकाऱ्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जैवविधिता आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला परिसर हे येथे येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण असून अनेक जण येथील सिंह व व्याघ्र सफारीचा अनुभव घेण्यासाठी आवर्जून येतात. राष्ट्रीय उद्यानाच्या १२५ चौरस किलोमीटर परिसरात बिबटय़ांचाही वावर आहे. या विस्तीर्ण जंगलात ३८ बिबटे असून त्यांच्या व्यतिरिक्त मानवी वस्तीत वारंवार गेलेले अथवा अन्य कारणांमुळे पकडलेले १७ बिबटे पिंजऱ्यात कैद आहेत. त्यामुळे येथे बिबटय़ांची सफारी असावी यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये मुंबई आणि चंद्रपूर येथे बिबटय़ांची सफारी असावी अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. यात पकडण्यात आलेल्या बिबटय़ांना सफारीमध्ये ठेवण्यात येईल अशीही त्यांनी घोषणा केली होती. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी यासाठी ६ सप्टेंबरला संजय गांधी उद्यानाच्या अधिकाऱ्यांसह उद्यानातील प्रस्तावित जागेचा दौराही केला होता. मात्र, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांनुसार बिबटय़ा सफारीसाठी कुंपणाची उंची २० फूट असावी आणि कुंपणाच्या आतील भागात २० फुटांपर्यंत झाडे नसावीत. कुंपणाजवळ झाडे असल्यास बिबटय़ा त्यावर चढून सफारीबाहेर सहज जाऊ शकतो. मात्र, उद्यानात घनदाट जंगल असल्याने अशी सफारी केल्यास वृक्षांची कत्तल करावी लागेल. यावर, उद्यान व्यवस्थापन पर्यावरणपूरक तोडगा शोधत आहे.

अन्य वन्यप्राण्यांचेही दर्शन

बिबटय़ा सफारीच्या जागेत इतर प्राण्यांची सफारी करण्यात येईल. यात हरीण, ससे आदी वन्यप्राण्यांचा सहभाग असेल. पर्यटकांना एका वाहनातून सफारीस  नेले जाईल असे पेठे म्हणाले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबटय़ा सफारी होणारच असून त्यासाठी आम्ही एखाद्या पर्यावरणपूरक मार्गाच्या शोधात आहोत. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने बिबटय़ा सफारी रद्द करण्याची सूचना केलेली नाही. त्यांच्या नियमांप्रमाणे सफारीच्या आत कुंपणालगत २० फुटापर्यंत झाडे नसावीत व उद्यानात खूप झाडे आहेत. ही झाडे कापावी लागतील. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होईल. म्हणून उद्यान व्यवस्थापनानेच हा निर्णय रहीत केला आहे. परंतु, नियमांना अधीन राहून बिबटय़ा सफारी भविष्यात करण्यात येईल.

-डॉ. शैलेश पेठे, पशुवैद्यकीय अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान