गोरेगावच्या आरे कॉलनीत बिबटय़ाने एकाच दिवसात दोन हल्ले केले. मंगळवारी पहाटे झालेल्या हल्ल्यात रिया मेसी या चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. तर संध्याकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ११ वर्षीय सुनिल भवर हा मुलगा जखमी झाला.
गोरेगावचा आरे कॉलनी परिसराच्या लगत हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे जंगल आहे. या आरे कॉलनीतील खडकपाडा वसाहतीत राहणारी रिया मेसी  ही चिमुरडी पहाटे प्रात:विर्धीसाठी बाहेर गेली होती. त्यावेळी अंधारात बिबटय़ाने तिच्यावर हल्ला केला. तिच्या किंकाळय़ा ऐकून स्थानिक रहिवासी मदतीला धावले.  तेव्हा बिबटय़ा जखमी रियाला सोडून पळून गेला. रियाला उपचारासाठी तातडीने गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे तिचा मृत्यू झाला.
ही घटना उलटून १२ तास लोटतात न तोच संध्याकाळी पुन्हा बिबट्याने आरे कॉलनीतील नवापाडा येथे एका मुलावर हल्ला केला. सुरेश भवर (११) हा मुलगा संध्याकाळी आपल्या वडिलांसोबत रस्त्यावरून जात होता. त्याचवेळी मागून आलेल्या बिबटय़ाने त्याच्यावर हल्ला केला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एकाच दिवशी झालेल्या दोन हल्ल्यांनी परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

Story img Loader