शहरात पसरलेल्या लेप्टोच्या साथीमुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंतच्या बळींची संख्या १४ वर पोहोचली आहे. लेप्टोस्पायरोसिस निश्चित झालेल्या रुग्णांची संख्या २६ वरून ३५ झाली असली, तरी पालिकेच्या विविध रुग्णालयांत लेप्टोच्या ८६ संशयित रुग्णांची नोंद आहे.
मालाड येथील ३८ वर्षांच्या पुरुषाला ५ जुलै रोजी पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. रे रोड येथील ४० वर्षांच्या पुरुषाला ८ जुलै रोजी रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा गुरुवारी मृत्यू झाला. या रुग्णाला मलेरिया व लेप्टोस्पायरोसिस हे दोन्ही आजार झाले असल्याने त्याची स्थिती गुंतागुंतीची झाली. दरम्यान पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एकीकडे लेप्टोचा रुग्ण आढळलेल्या परिसरात तापाच्या रुग्णांवर उपचार सुरू केले असून दुसऱ्या बाजूने उंदरांना मारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, २६ जुलैच्या महापुरानंतर पहिल्यांदाच एवढय़ा अधिक प्रमाणात लेप्टोमुळे मृत्यू झाले असून संपूर्ण मुंबईत पाणी तुंबलेले असताना केवळ मालाड ते दहिसर या भागातच झालेल्या या मृत्युसत्रामागील कारणाबाबत आरोग्य विभाग कोडय़ात पडलेला आहे. गेल्या पाच वर्षांत लेप्टोचे काही मृत्यू झाले असले, तरी एकाच परिसरात लेप्टोची साथ आली नव्हती, अशी माहिती आरोग्य खात्यातील एका अधिकाऱ्याने दिली. ‘यामागचे निश्चित कारण अजूनही लक्षात आलेले नाही. मात्र त्या कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे’, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर म्हणाल्या.

आतापर्यंतचे मृत्यू            – १४
रे रोड                                    – १
महालक्ष्मी                             – १
मालाड                                   – ५
कांदिवली                               – ३
दहिसर                                  – ४
१ ते ९ जुलैदरम्यानचे रुग्ण     – ३०
जानेवारी ते जून
दरम्यानचे रुग्ण                  – ५

Story img Loader