गणेश विसर्जनातील मिरवणुकी वेळी वाजवण्यात आलेल्या डीजेमुळे कानाला दडे बसले असले तरी अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या वर्षीपेक्षा यावेळी गणेशोत्सव कमी आवाजात पार पडला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेण्यात आलेल्या नोंदीनुसार सर्वच दिवशी, सर्व ठिकाणी आवाज ठरवून दिलेल्या पातळीपेक्षा जास्त असला तरी तो गेल्या वर्षीपेक्षा कमी असल्याचे दिसत आहे.
विश्वास बसो अथवा नको, पण यावेळचा गणेशोत्सव तुलनेने शांततेत पार पडला आहे. किमान मंडळाने घेतलेल्या आकडेवारीवरून तरी तसे दिसते. ध्वनी प्रदूषणाच्या नियमानुसार सकाळी ५५ डेसिबल आणि रात्री ५० डेसिबलची ध्वनी मर्यादा घालण्यात आली आहे. गणेशोत्सवात सर्वच ठिकाणी ही मर्यादा ओलांडली गेली. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. मात्र यावेळी गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह लालबाग, दादर, अंधेरी या ठिकाणीही आवाजाची पातळी गेल्या वर्षीपेक्षा कमी प्रमाणात दिसून आली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने विसर्जनाच्या दुसऱ्या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या दिवशी शहरातील ३१ ठिकाणी आवाजाची पातळी मोजली. या ठिकाणामध्ये सार्वजनिक गणेश मंडळे तसेच चौपाटय़ांचा समावेश आहे. दिवसभरातील आवाजाची सरासरी तसेच आवाजाची कमाल व किमान पातळी यांची नोंद घेण्यात आली. या माहितीची गेल्या वर्षीच्या माहितीशी तुलना मंडळाच्या संकेतस्थळावर विस्तृतपणे देण्यात आली आहे. काही ठिकाणांचा अपवाद वगळता ९० टक्क्य़ांहून अधिक ठिकाणी आवाजाची सरासरी पातळी खाली आली आहे. एवढेच नव्हे तर गेल्या वर्षी सातत्याने १०० डेसिबलवर नोंदवण्यात आलेली कमाल पातळी यावेळी ९० पेक्षा खाली आहे. आवाजाची किमान पातळीही काही ठिकाणी ५५ डेसिबलपेक्षाही कमी नोंदवण्यात आली आहे.
या वर्षी गिरगाव चौपाटीवर ढोलताशांना बंदी घालण्यात आली. ढोलताशे नसल्याने सूचना देणाऱ्या पोलिसांच्या ध्वनिक्षेपकाचा आवाजही कमी होता. त्याचप्रमाणे जुहू चौपाटीवरही आवाजाची पातळी कमी होती. शिवाजी पार्कही शांत होते.
विसर्जनाच्या मिरवणुकांची संख्याही कमी झाली होती, असे निरीक्षण ध्वनी प्रदूषणाच्या अभ्यासक सुमायरा अब्दुलाली यांनी मांडले. मात्र विसर्जन मिरवणुकांमध्ये वाजवण्यात येणाऱ्या ढोल ताशांचा आवाज ११३ डेसिबल तर अॅटम बॉम्बचा आवाज १४० डेसिबलपेक्षा जास्त असतो. त्यामुळे आवाजाच्या पातळीचा खरा अंदाज येण्यासाठी ऑपेरा हाउस, लॅमिंग्टन रोडसारख्या विसर्जन मिरवणुकांच्या वाटेवर नोंद करायला हवी. आम्ही केलेल्या पाहणीत मिरवणुकीतील आवाजाच्या कमाल पातळीत वाढ झालेली आढळली, असेही त्यांनी स्पष्ट केले.
* यावेळी गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह लालबाग, दादर, अंधेरी या ठिकाणीही आवाजाची पातळी गेल्या वर्षीपेक्षा कमी प्रमाणात दिसून आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा