कनिष्ठ न्यायालयात आपल्याविरुद्ध चालविण्यात आलेला खटला योग्य प्रकारे चालविण्यात आला नव्हता आणि राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) २००६ सालच्या मालेगाव स्फोटाप्रकरणी केलेला तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) चुकीचा ठरविला. इतकेच नव्हे तर त्यातील आरोपींचा सहभाग नसल्याचे स्पष्ट केले. भविष्यात आपल्याबाबतही असे घडण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे ‘एनआयए’तर्फे तपास पूर्ण केला जाईपर्यंत आपल्या अपिलावरील सुनावणी पुढे ढकलावी, अशी मागणी जर्मन बेकरी स्फोटातील फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला एकमेव आरोपी हिमायत बेग याने सोमवारी उच्च न्यायालयाकडे केली.
हा खटला म्हणजे आपल्या जीवन-मरणाचा प्रश्न असून, आपल्याला अपिलावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयासमोर प्रत्यक्षपणे हजर करावे, अशी मागणी बेगने केली. मात्र न्यायालयाने त्यास नकार देत गरज भासेल तेव्हा त्याला हजर करण्याचे आदेश दिले जातील, असे स्पष्ट केले.
जर्मन बेकरी स्फोटातील एकमेव आरोपी असलेल्या हिमायत बेगला कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याला बेगने उच्च न्यायालयात आव्हान दिले असून न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरामाणी आणि न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठासमोर त्याच्या अपिलावरील सुनावणीस सोमवारपासून सुरुवात झाली. सध्या आर्थर रोड कारागृहात बंदिस्त असलेल्या हिमायतला सुनावणीच्या पहिल्या सत्रात ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा त्याने ही मागणी केली. त्यामुळे दुपारच्या सत्रात त्याला हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर बेगने आपल्या वकिलांकरवी पुणे कनिष्ठ न्यायालयाने आपल्यावरील खटला योग्य प्रकारे चालविला नसल्याची तक्रार न्यायालयाकडे केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा