म्हाळगी प्रबोधिनीच्या त्रिदशक पूर्तीचा समारंभ सुरू असताना अचानक नितीन गडकरींच्या हातात ज्येष्ठ नेते राजनाथसिंह यांच्या निरोपाची एक चिठ्ठी देण्यात आली. त्यातील निरोप वाचला, त्यावरच उत्तर लिहीले, पण त्यांचा मूड पालटल्याचे लगेचच त्यांच्या देहबोलीतून जाणवले. समारंभ संपताच, अगोदरच तयार असलेले राजीनाम्याचे पत्रही गडकरींनी रवाना केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा असला तरी जेठमलानी पिता-पुत्र, यशवंत सिन्हा यांनी तोफा डागल्याने पक्षातील नाराजी स्पष्ट होत असतानाच लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज आदी नेत्यांनीही गडकरींना विरोध दर्शविला होता. गेल्या तीन-चार दिवसांपासून या विरोधाची धार तीव्र झाल्यावरच राजीनामा देण्याचा निर्णय पक्का झाला होता. त्यामुळे मंगळवारी सकाळी काही भाजप नेत्यांनी अभिनंदन करून त्यांना दिलेले पुष्पगुच्छहीत्यांनी स्वीकारले नाहीत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्याशी गडकरींची चर्चा झाली, तेव्हा जोशी यांनीही त्यांना पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावे, अशी सूचना केली होती. संघासह काही नेत्यांच्या आग्रहामुळे पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावे की नाही, याबाबत गडकरी द्विधा मनस्थितीत होते. म्हाळगी प्रबोधिनीचा कार्यक्रम सुरू होण्याआधी त्यांनी राजीनाम्याचे पत्र तयार ठेवले होते, मात्र पाठविले नव्हते. कार्यक्रमासाठी अडवाणी हेलिकॉप्टरने आले, तेव्हा चहापानाच्या निमित्ताने पंधरा मिनिटे गडकरी, अडवाणी व जोशी एकत्र होते. मात्र तेथेही फारशी चर्चा झाली नाही. अडवाणींचा गडकरींना पाठिंबा मिळणे शक्य नसल्याचे त्यावेळच्या अडवाणींच्या संकेतांवरूनही स्पष्ट झाले.
म्हाळगी प्रबोधिनीत कार्यक्रम सुरू झाला असताना दिल्लीतही भाजप नेत्यांची बैठक सुरू झाली. त्यांच्या बाजूने वरिष्ठ नेत्यांचा कल नाही, हेही स्पष्ट झाले होते. मुंबईतील कार्यक्रम व बैठक आटोपून रात्री दिल्लीला परतल्यावर राजीनाम्याची आणि राजनाथ सिंह यांच्या नावाची शिफारस आपण करतोहोत, असे गडकरींनी कळविले.