मुंबई: शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची व पदपथांची कामे सुरू असून ही कामे करताना कंत्राटदार झाडांची योग्य ती काळजी घेत नाहीत. यंत्राचा वापर करून खोदकाम करताना वृक्षांच्या बुध्याला व मुळाला धक्का लागून झाडे कमकुवत होत आहेत. त्यामुळे रस्ते व पदपथांची कामे करताना झाडांची योग्य ती काळजी घ्यावी, अशी विनंती उद्यान विभागाने रस्ते विभागाला केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रस्त्यांची कामे करणाऱ्या बेफिकीर कंत्राटदारांमुळे वृक्षसंपदेचे नुकसान होते. काही दिवसांपूर्वी नानाचौक परिसरातील ऑगस्ट क्रांती मैदानाजवळील एका पदपथाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू होते. त्यावेळी कंत्राटदाराच्या चुकीमुळे गुलमोहराचे झाड उन्मळून पडले. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी कंत्राटदाराच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडल्याने गावदेवी पोलीस ठाण्यात विभाग कार्यालयाच्यावतीने तक्रार नोंदवण्यात आली होती.

हेही वाचा… “अरे मेरे को छोड दो बाबा, ये राँग है”, शरद पवारांच्या राजीनाम्याबाबतच्या प्रश्नावर अजित पवारांचं मिश्किल उत्तर!

अशाच प्रकारच्या तक्रारी विविध विभागातून वृक्षप्रेमी, जागरूक नागरिकांकडून करण्यात येत असल्यामुळे उद्यान विभागाने आता रस्ते विभागाला पत्र पाठवून झाडांची काळजी घेण्याची विनंती केली आहे. झाडांची मुळे कमकुवत झाल्यास पावसाळ्यात ती उन्मळून पडण्याची शक्यता असते. तसेच मुंबई शहरातील पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षांचे महत्त्व अनन्य साधारण असल्याने पायाभूत सुविधांचा विकास करताना पर्यावरणाचा समतोल देखील सांभाळणे आवश्यक असल्याचे मत रस्ते विभागाला पाठवलेल्या पत्रात व्यक्त करण्यात आले आहे.

हेही वाचा… “तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर…”, राजीनाम्याबाबत शरद पवारांचा मोठा निर्णय; अजित पवारांकरवी पाठवला कार्यकर्त्यांसाठी संदेश!

झाडे कापण्याचे प्रस्ताव आयत्या वेळी

बांधकामाच्या आड येणारी झाडे कापण्यासाठी किंवा पुनर्रोपित करण्यासाठीचे प्रस्ताव हे प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंंतर सादर केले जात असल्याबद्दलही या पत्रात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. विकासकामाच्या आड येणारी झाडे हटवण्याबाबत परवानगी देण्याच्या प्रक्रियेसाठी वृक्षप्राधिकरणाला दोन महिने कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे कोणत्याही कामाच्या आड येणारी झाडे कापण्यासाठीचे प्रस्ताव हे निविदा प्रक्रियेदरम्यानच यावेत, अशीही अपेक्षा या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

कंत्राटदारांचा असा निष्काळजीपणा

रस्त्याची कामे करताना झाडांच्या भोवती नियमानुसार १ मीटर बाय १ मीटरची जागा सोडणे आवश्यक असते. मात्र कंत्राटदार अशी जागा सोडत नाहीत. तसेच वृक्षांभोवती लाल माती व खत यांचा भराव न टाकता त्याऐवजी राडारोडा टाकण्यात येतो. तसेच खोदकामासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रांमुळे झाडांची मुळे कमकुवत होतात व वाऱ्याबरोबर उन्मळून पडतात. तसेच रस्त्यांची कामे करताना नवीन झाडांसाठीही जागा ठेवली जात नसल्याचीही तक्रार वृक्षप्रेमींनी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Letter from garden department to roads department to take care of trees while constructing roads in mumbai mumbai print news dvr
Show comments