लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : तिरुअनंतपुरम येथून मुंबईला येणाऱ्या विमानात बॉम्बच्या धमकीची चिठ्ठी सापडली होती. त्याप्रकरणी सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात धमकी देणे व प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी तपास करण्यात येत आहे. विमानाच्या प्रसाधनगृहात टिश्यू पेपरवर ‘बॉम्ब ब्लॅक बॅग’ असा संदेश लिहून ठेवला होता. ही चिठ्ठी सापडताच विमानतळ सुरक्षा व पोलिसांनी सर्वत्र तपासणी केली. पण काहीही संशयास्पद सापडले नाही.

विमानातील कर्मचाऱ्यांना शुक्रवारी विमानाच्या प्रसाधनगृहात चिठ्ठी सापडली होती. प्रसाधनगृहात टिश्यूवर ‘बॉम्ब ब्लॅक बॅग’ असा संदेश लिहिला होता. त्यानंतर त्यांनी नियमाप्रमाणे सर्व यंत्रणांना याबाबतची माहिती दिली. दुपारी सव्वातीनच्या सुमारास विमान मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच विमान कंपनीने पोलिसांना याची माहिती दिली. प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून उतरवण्यात आल्यानंतर तात्काळ सर्व वस्तू व बॅगांची तपासणी करण्यात आली. त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. विमान कर्मचारी राजश्री हगजर यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी सहार पोलिसांनी भादंवि कलम ५०६ (२) व ५०५ (१) (ब) व विमान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासणी दरम्यान राजश्री यांनाच धमकीचा संदेश असलेला टिश्यू प्रसाधनगृहातील बेसिनमध्ये सापडला होता.

आणखी वाचा-अकरावी प्रवेश प्रक्रिया : दुसरी प्रवेश यादी १० जुलैला जाहीर होणार

विस्तारा विमान कंपनीच्या प्रतिनिधीनी याबाबत शुक्रवारी अधिकृत माहिती दिली. तिरुअनंतपुरम येथून २८ जून २०२४ रोजी मुंबईला जाणारे विस्तारा कंपनीचे विमान ‘यूके ५५२’मधील कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. नियमानुसार, ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आली आणि विमान सुरक्षितपणे आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले. त्यानंतर सुरक्षा तपासणी पूर्ण करण्यात आली होती, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली.