लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या रखडलेल्या १७ झोपु योजना मार्गी लावण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. यापूर्वी जोगेश्वरीतील एका झोपु योजनेसाठी मंडळाला झोपु प्राधिकरणाकडून इरादा पत्र (एलओआय) देण्यात आले होते. आता आणखी दोन योजनांना झोपु प्राधिकरणाने इरादा पत्र दिले असून रखडलेल्या योजना मार्गाी लावण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
कुर्ल्यातील श्रमिक नगर गृहनिर्माण संस्था आणि चेंबूरमधील जागृती सहकारी संस्था अशा या योजना असून आता एकूण तीन झोपु योजना मंडळाकडून मार्गी लावल्या जाणार आहेत. दरम्यान, चेंबूर आणि कुर्ल्यातील झोपु योजनांसाठी मंडळाकडून सूचना – हरकती मागविण्यात आल्या आहेत. येत्या सात दिवसांत संबंधितांना आपल्या सूचना – हरकती नोंदविता येणार आहेत.
रखडलेल्या २१ योजना म्हाडाकडे
झोपु प्राधिकरणाच्या ५०० हून अधिक झोपु योजना विविध कारणाने रखडल्या आहेत. रखडलेल्या या योजनांपैकी काही योजना विविध सरकारी प्राधिकरणाच्या, महामंडळाच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार म्हाडाला २१ योजनांची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र २१ पैकी चार योजना व्यवहार्य ठरत नसल्याचा मुद्दा उपस्थित करून मंडळाने १७ योजना मार्गी लावण्याचा निर्णय घेत पुढील कार्यवाहीस सुरुवात केली आहे.
या कार्यवाहीप्रमाणे मंडळाकडून काही योजनांचे प्रस्ताव मंजुरीसाठी झोपु प्राधिकरणाकडे पाठविण्यात आले होते. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच झोपु प्राधिकरणाने जोगेश्वरीतील १५५० चौरस मीटर जागेवरील साई बाबा सहकारी नियोजित गृहनिर्माण संस्थेच्या झोपु योजनेसाठी इरादा पत्र (एलओआय) दिले आहे. तर ३ मार्चला चेंबूर आणि कुर्ल्यातील झोपु योजनेसाठीही इरादा पत्र दिले आहे. कुर्ला नेहरु नगर येथील १५६४ चौरस मीटर जागेवरील श्रमिकनगर सहकारी संस्था आणि चेंबूरमधील २००८ चौरस मीटर जागेवरील जागृती सहकारी संस्थेचा यात समावेश आहे.
लवकरच योजना मार्गी
इरादा पत्र मिळाल्याने आता या योजना प्रत्यक्ष मार्गी लावण्याच्यादृष्टीने पुढील कार्यवाहीस मंडळाने वेग दिला आहे. त्यानुसार मंगळवारी मंडळाकडून वर्तमानपत्रात एक जाहिर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सूचनेनुसार या दोन्ही झोपु योजनांसंदर्भात कोणत्याही व्यक्तिला काही हरकत घ्यायची असेल तर त्यांनी सात दिवसांच्या आत आपल्या सूचना-हरकती मंडळाकडे नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. सूचना – हरकतींची प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक त्या मान्यता घेऊन प्रत्यक्ष बांधकामासाठी निविदा मागविल्या जाणार आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यातच म्हाडाकडून तीन झोपु योजनांच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.