मुंबई : रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वेगाड्यांचा वेग वाढवा यासाठी रेल्वे प्रशासनाने जुन्या प्रकारातील, पारंपरिक पद्धतीमधील डब्यांऐवजी लिंके हॉफमन बुश (एलएचबी) प्रकारातील डबे जोडण्यात येत आहेत. महालक्ष्मी एक्स्प्रेसला इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) प्रकारातील डब्यांऐवजी कायमस्वरूपी लिंके हॉफमन बुश (एलएचबी) डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रवाशांना नव्या धाटणीच्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून प्रवास करता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई-कोल्हापूर आणि कोल्हापूर-मुंबई प्रवासासाठी प्रवासी महालक्ष्मी एक्स्प्रेसला पसंती देतात. यात रेल्वेगाडीमधून अनेक प्रवासी दररोज प्रवास करतात. कोल्हापूरकरांसाठी ही खूप महत्त्वाची रेल्वेगाडी असून, मुंबई-कोल्हापूर प्रवास करणे सोयीस्कर होते. त्यामुळे या प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुरळीत होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या रेल्वेगाडीला एलएचबी डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या रुपातील महालक्ष्मी एक्स्प्रेस २५ जानेवारीपासून मुंबई कोल्हापूर मार्गावर, तर कोल्हापूर-मुंबई मार्गावर २६ जानेवारीपासून धावणार आहे.

हेही वाचा >>>तलाठी भरतीविरोधात काँग्रेसचे लोकल रोको आंदोलन

जुन्या प्रकारातील आणि पारंपरिक पद्धतीच्या डब्यांच्या तुलनेत एलएचबी डब्यांची लांबी आणि रुंदी जास्त आहे. तसेच डब्यामधील शौचालय आणि बेसिंग यांच्या रचनेत सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करणे सोयीस्कर होते. तसेच दरवाजाची रुंदी अधिक असल्याने प्रवाशांना सामान घेऊन प्रवास करणे सुकर होते. एलएचबी डब्यांची बांधणी स्टीलने केलेली असून आतून ॲल्युमिनिअमचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेगाडीचे वजन कमी होते. त्यामुळे रेल्वेगाडीला वेग घेणे अधिक सोपे होते. तसेच अपघाताच्या वेळी हे डबे उलटण्याची शक्यता कमी असते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lhb coaches will be added permanently to mahalakshmi express mumbai print news amy
Show comments