‘लिहावे नेटके’कर्त्यां माधुरी पुरंदरे यांची अस्वस्थता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपण हल्ली स्वयंपाक करत नाही- ‘जेवण बनवतो’;  पण आपण चित्रपटही बनवतोच आणि बाहेर कुठे जायचा प्रोग्राम किंवा बेतही बनवतो.. अशी उदाहरणे माधुरी पुरंदरे देत होत्या; सभागृहातले पन्नासेक श्रोते डोळय़ांत पाणी येईपर्यंत हसू लागले होते! ते पाणी पुसताना मात्र, मराठी भाषेच्या दुरवस्थेबद्दलचे अश्रू तर आपण पुसत नाही ना, अशी शंका प्रत्येकाच्या मनात उमटावी इतकी अस्वस्थता ‘लिहावे नेटके’ पुस्तकसंचाच्या या लेखिकेने मुंबईत रविवारी झालेल्या या कार्यक्रमातून नेमकी पोहोचवली होती.

एका हिंदी ‘बनाना’ने रांधणे, दिग्दर्शित/ निर्मित करणे, आखणे, उभारणे अशी अनेक क्रियापदे कशी केळीच्या सालीसारखी भिरकावली, हे लक्षात न आलेल्यांना त्याची जाणीव देणाऱ्या याच कार्यक्रमात, ‘मराठी वाचनाची लहानपणापासून गोडी’ लागण्याबद्दल काही निरीक्षणेही ऐकायला मिळाली. विंदा, पाडगावकर, बापट आदी १९६० च्या दशकातील पिढीनंतरच्या मराठी साहित्यिकांनी मुलांसाठी खास म्हणून काही लिहिले नाही. याच काळात बालसाहित्य म्हणून आठ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी अनेक पुस्तके येत राहिली; पण आदली पिढी बालपणीच विंदा- बापट- पाडगावकरांचा ‘कसदार’ संस्कार मिळाल्याबद्दल कृतज्ञ राहाते; तर त्याच कवितांमधले अनुभवविश्व पुढल्या पिढय़ांतल्या मुलांना परके वाटते. हे अटळच असणार, याचे भान त्यांनी श्रोत्यांना दिले.

भायखळा येथील भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या शिक्षण विभागात सकाळी साडेअकरापासून दुपारी पावणेदोनपर्यंत माधुरीताईंनी आपला ‘शब्द-चित्र प्रवास’ मांडला. साहित्य अकादमीच्या बालसाहित्य पुरस्काराच्या मानकरी, मराठी भाषेचे अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष अनुभवनिष्ठ ज्ञान देणाऱ्या ‘वाचू आनंदे’ आणि ‘लिहावे नेटके’ या पुस्तकमालिकांच्या आणि त्याही आधी ‘व्हॅन गॉग’ व ‘पिकासो’ यांचा जीवनपट मांडणाऱ्या पुस्तकांच्या कर्त्यां, मराठीची काव्य-संगीत समृद्धी चंद्रकांत काळे यांच्यासह आखलेल्या अनेक विशेष कार्यक्रमांतून श्रोत्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या गायिका-अभिनेत्री, ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मधून १९७० च्या दशकात पदविका मिळाल्यानंतर फ्रेंच शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थिनी, फ्रान्स वास्तव्यात चित्रदालने, प्रदर्शने, चित्रपट, नाटके भरपूर पाहातानाच ‘एकटेपणाच्या अनुभवातून माणूस म्हणून समृद्ध’ होणाऱ्या आणि पुढे भारतात परतल्यावर ती आत्मजाणीव समाजाभिमुख ठेवून कार्यरत राहणाऱ्या प्रतिभावंत.. असे एक समृद्ध व्यक्तिमत्त्व श्रोत्यांपुढे उलगडणारा हा कार्यक्रम होता.

‘‘फ्रान्सहून आल्यानंतर काही काळ ग्राफिक्समध्ये मी कामही करत होते; पण प्रदर्शन वगैरेचा प्रश्नच नव्हता. मी मुळात महत्त्वाकांक्षी नाही. त्यामुळे गाण्याकडे गेले, गाण्यातून नाटकाकडे गेले.. आणि पुण्यातल्या आलियाँ फ्रान्स्वांनं (फ्रेंच संस्कृतिसंधान संस्थेनं) ‘फ्रेंच शिकवायला आमच्याकडे कुणी नाही. तुम्ही या,’ असं सांगितल्यावर- क्रियापद/ क्रियाविशेषण अशा व्याकरणात कधीच न अडकलेली मी तिथे शिकवता-शिकवताच, शिकवणं शिकू लागले’’ असा काहीसा अनाग्रही सूर लावणाऱ्या माधुरीताईंनी आजवर इष्टमित्रांना सांगितलेले काही प्रसंग इथे सांगितले. गोगँच्या चित्राच्या मागल्या बाजूला- त्याच कॅनव्हासवर- सेझां यांनी रंगविलेले चित्र संग्रहालयाच्या सुरक्षारक्षकाने फक्त ‘नेहमी येणाऱ्या मुली’ला कौतुकाने उलगडून दाखविल्याची आठवण, ल’अनी डेर्निए आ मॅरिएनबाद् (लास्ट इयर इन मॅरिएनबाद्) हा चित्रपट ४० वर्षांत अनेकदा पाहिल्यानंतरच उमगल्याची कबुली, गायतोंडे यांचे पॉल क्लेच्या शैलीतील एक प्रसिद्ध- आणि ‘वाचू आनंदे’च्या मुखपृष्ठावरील- चित्रात मानवाकृतीच्या (मुलीच्या) डोळय़ांतील रक्ततांबडा रंग आहे याची अचानकच एकदा सखोल जाणीव झाल्यानंतर त्या चित्राने आजही जिवंत ठेवलेली हुरहुर, असे कैक प्रसंग.

पण या प्रसंगकथनामागे सूत्र होते अस्वस्थतेच्या अनेक रूपांचे. जी अस्वस्थता नाटक, चित्रपट, चित्रकला, अनुवाद, लेखन, संपादन अशा प्रातिभ रूपांनी प्रकटली, तिनेच समाजाबद्दलचे प्रश्नही उपस्थित केले. तिनेच काही अप्रिय उत्तरेही दिली, उदाहरणार्थ- ‘भाषेबद्दल आपण अभिमान बाळगतो, कारण अभिमान बाळगल्याने करावे काहीच लागत नाही’ किंवा ‘आपल्याकडे मराठी शिकवतात म्हणजे धडे शिकवतात – भाषा शिकवतच नाहीत’. या अस्वस्थतेतून कार्यप्रवण व्हावे, हाती घेतलेले काम तडीस लावावे आणि त्याची लोकांकडून प्रशंसा वगैरे होत असतानाच अगदी हताशा, उद्वेग यांच्या काठाशी नेणारे ‘समाजदर्शन’ पुन्हा व्हावे.. असा हा ‘शब्दचित्र प्रवास’ पुढे कोणत्या टप्प्यावर जाणार, याबद्दल त्या स्पष्टपणे काही बोलल्या नाहीत.

मात्र, ‘‘‘वाचू आनंदे’चा पुढला भाग काढू या असं म्हटलं तर कोणाचं लिखाण त्यात असेल, असा प्रश्नच पडतो मला’’ किंवा ‘‘आठ-नऊ वर्षांच्या पुढल्या वयातल्या मुलांसाठी मराठीत काही लिहिलं जात नाही’’ ही त्यांची वाक्ये, त्यांचा प्रवास थांबला असेलही, पण संपलेला नाही असा विश्वास दृढ करणारी होती.