टाळेबंदीमुळे उत्पन्नाचे सर्व स्रोत बंद
नमिता धुरी, लोकसत्ता
गेल्या सहा महिन्यांचे अनुदान न मिळाल्याने आधीच मेटाकु टीला आलेला राज्यातील ग्रंथालयांचा जीव आता करोना टाळेबंदीमुळे गुदमरला आहे. सभासद वर्गणी आणि उत्पन्नाचे इतर स्रोत बंद असल्याने सार्वजनिक ग्रंथालयांचे आर्थिक कं बरडे मोडले आहे.
अनेक ग्रंथालयांच्या दृष्टीने एप्रिल, मे, जून हा कालावधी सभासद नोंदणीसाठी महत्त्वाचा असतो. पण नेमकी त्याच काळात टाळेबंदी लागू होती. त्यामुळे सभासद नोंदणीतून मिळणारे उत्पन्न बुडाले. चार महिन्यांपासून ग्रंथालये आणि त्यांचे वाचनकक्ष बंद असल्याने तेही उत्पन्न मिळू शकले नाही.
‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’च्या नियमित वर्गणीच्या उत्पन्नाबरोबरच श्राद्ध, गणेशोत्सव यानिमित्ताने मिळणाऱ्या देणग्याही बंद आहेत. त्यामुळे ग्रंथालये सुरू झाल्यावर सभासदांना देणगीसाठी आवाहन करण्यात येईल. जनसंपर्क जेवढा चांगला तेवढे जास्त अर्थसाह्य़ मिळू शके ल, अशी अपेक्षा ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’चे अधीक्षक सुनील कुबल यांनी व्यक्त केली. ‘दादर सार्वजनिक वाचनालया’साठी उत्पन्नाचा स्रोत असलेली दोन सभागृहे पालिके ने विलगीकरणासाठी ताब्यात घेतल्याने कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी ग्रंथालयाकडे पैसे नाहीत, असे प्रमुख कार्यवाह दत्ता कामठे यांनी सांगितले.
ग्रामीण भागात अस्तित्वाचा प्रश्न
छोटय़ा शहरांतील वाचनालयांपुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. चिपळूणच्या ‘लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर’चे दीड हजार सभासद आहेत. त्यापैकी ३५० आजीव सभासद वगळता इतर सभासदांकडून प्रतिमहा २० ते ३० रुपये वर्गणी येते. दर महिन्याला किमान ४० वाचक सभासद होतात. सध्या वर्गणी बंद असल्याने ग्रंथालयाचे कि मान ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ग्रंथालयातर्फे लोकसहभागातून उभारलेले कलादालन आणि वस्तुसंग्रहालय बंद असल्याने त्यातून मिळणारे उत्पन्नही बुडाले आहे. ग्रामीण भाग असल्याने वर्गणी वाढवता येणार नाही, असे ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी सांगितले. माझ्या पत्नीने दिलेल्या ५१ हजार रुपये देणगीतून कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.
वादळाचाही फटका
रायगडमधील ‘म्हसळा सार्वजनिक वाचनालया’ला दुहेरी फटका बसला आहे. टाळेबंदीमुळे आर्थिक नुकसान होतेच आहे, शिवाय काही दिवसांपूर्वी आलेल्या वादळाने वाचनालयावरील छप्पर उडून गेले. त्यामुळे सहा-सात हजार पुस्तके भिजली. त्यात वि. दा. सावरकरांचे ‘सहा सोनेरी पाने’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणांचे खंड, मराठी-इंग्रजी विश्वकोश इत्यादी पुस्तकांचा समावेश आहे. पुस्तके वाळवावी लागली. विद्युत उपकरणे आणि छप्पर यांच्या दुरुस्तीसाठी दोन ते अडीच लाख रुपये खर्च आला. सभागृहाच्या भाडय़ातून महिन्याकाठी साधारण १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते, टाळेबंदीत तेही बंद आहे. रायगड जिल्हा ग्रंथालय संघ आणि वाचकांनी दिलेल्या देणग्यांमुळे दुरुस्ती आणि कर्मचाऱ्यांचे वेतन देणे शक्य झाले, असे वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे यांनी सांगितले.
वाचकांच्या भावना
ज्ञानवृद्धी हीच संस्कृती मानणाऱ्या वाचकवर्गासाठी ग्रंथालये बंद असणे हा सांस्कृतिक आणि वैचारिक आघात ठरला आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक, पट्टीचे वाचक, अभ्यासक यांनी वाचन संस्कृती टिकवली आहे. परंतु ग्रंथालये बंद असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. दुर्मीळ आणि आधुनिक ग्रंथांचा ठेवा वर्षांनुवर्षे जपणाऱ्या ग्रंथालयांची वाताहत वाचकांना व्यथित करत आहे. ‘ग्रंथालये सुरू झाल्यास अंतर नियम पाळू, अशी ग्वाही वाचक देतात. मी एकटाच आलो आहे ना! मग पुस्तक द्यायला काय हरकत आहे?’ असा युक्तिवाद करून काही जण ग्रंथपालांशी वादही घालतात, असे काही ग्रंथपालांनी सांगितले.
‘पुस्तकांच्या दुकानांपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना पोहोचता येत नाही. शिवाय, पुस्तके खरेदी तरी किती करणार? त्यापेक्षा ग्रंथालयात पुस्तके चाळून आपल्या आवडीनुसार निवडता येतात. पण सध्या काहीच विरंगुळा उरलेला नाही, अशी खंत ८० वर्षीय वाचक वसुधा मेहेंदळे यांनी व्यक्त केली.
सध्याच्या स्थितीत घरून काम करताना मानसिक ताण घालवण्यासाठी वाचनाची मदत होते. त्यामुळे ग्रंथालय ही मानसिक गरज असल्याचे वाचक मिलिंद बापट यांनी सांगितले.
संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी मला ग्रंथालयात जावे लागते. पण आता माझी अडचण होत आहे. विविधांगी वाचन के ल्याने दृष्टिकोन तयार होतो. पण आजकाल मराठी वाचन कमी झाले आहे. त्यामुळे ग्रंथालयांसाठी लोकचळवळ उभी राहिली पाहिजे, अशी अपेक्षा निवृत्त शिक्षिका मुग्धा बर्वे यांनी व्यक्त केली.
अर्थिक घडी का विस्कटली
‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’च्या ४४ शाखांमध्ये महिन्याकाठी ६०० नव्या सभासदांची नोंदणी होते. प्रतिमहा प्रतिसभासद ७० रुपये याप्रमाणे एप्रिल ते जुलै या कालावधीत एक लाख ६८ हजार रुपये वर्गणी ग्रंथालयास मिळाली असती. परंतु टाळेबंदीमुळे ग्रंथालयाला वर्गणी गमवावी लागली.
दररोज साधारण १००
वाचक वाचन कक्षात येऊन ग्रंथाभ्यास करतात. त्यासाठी प्रतिवाचक दहा रुपये वर्गणी घेतली जाते. ग्रंथालय सुरू असते तर चार महिन्यांत एक लाख २० हजार रुपये वाचक वर्गणी मिळू शकली असती. मात्र, टाळेबंदीमुळे हे उत्पन्न गमवावे लागले.
‘दात आहेत पण चणे नाहीत, अशी वाचकांची अवस्था आहे. वाचायला भरपूर वेळ असूनही ग्रंथालये बंद आहेत. सगळे व्यवहार सुरू झाले की जीवनाची लढाई सुरू होईल, तेव्हा वाचायला वेळ मिळणार नाही. दूरचित्रवाणी, भ्रमणध्वनी यावर वेळ घालवून लोक कं टाळले आहेत. छापील पुस्तके वाचण्याचा आनंद ई-बुकमध्ये मिळत नाही. ग्रंथालय हे ज्ञानवृद्धीच्या माध्यमातून सुसंस्कृत समाजनिर्मितीचे के ंद्र आहे. त्यामुळे ग्रंथालयाचे संवर्धन आणि विकास व्हायला हवा.
– राजेंद्र सुतार, मानद सचिव, राजगुरूनगर सार्वजनिक वाचनालय, खेड