मुंबई : उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना मोबाइल आणि टीव्हीपासून दूर ठेवण्यासाठी, तसेच त्यांच्या वाचनामध्ये खंड पडू नये, अवांतर वाचनावरही विद्यार्थ्यांनी भर द्यावा यासाठी महानगरपालिका प्रशासनाने खास युक्ती लढवली आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाने ‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून प्रत्येक प्रशासकीय विभागातील मध्यवर्ती शालेय इमारतीमध्ये वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. येत्या २ मे ते १२ जून या उन्हाळी सुटीच्या कालावधीत प्रत्येकी एक अशी एकूण २५ वाचनालये सुरू करण्यात येणार आहे. महानगरपालिका आणि खासगी शाळेतील इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही वाचनालये खुली ठेवण्यात येणार आहेत.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी महानगरपालिकेतर्फे वेळोवेळी विविध उपाययोजना व उपक्रम राबविण्यात येतात. त्याच अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी, उप आयुक्त डॉ. प्राची जांभेकर यांच्या आदेशानुसार वाचनालयांचा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. उन्हाळी व दिवाळी सुट्टीच्या कालावधीत बहुतांश विद्यार्थ्यांच्या वाचनात खंड पडतो. सुट्टी कालावधीत मोबाइल, टीव्ही यांसारख्या मनोरंजनाच्या साधनांकडे विद्यार्थ्यांचा कल झुकतो. ही समस्या ओळखून महानगरपालिका शाळांमध्ये दीर्घ सुट्टीच्या कालावधीत इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. दररोज सकाळी १० ते दुपारी १ आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळेत विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरू ठेवण्यात येणार आहे.

खासगी शाळांतील मुलांनाही संधी

महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक विभागातील एका मध्यवर्ती शाळेत येत्या २ मेपासून वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. या वाचनालयात भरपूर पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील. या वाचनालयाचा लाभ महानगरपालिकेच्या इयत्ता ६ वी ते इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यासह खासगी शाळेतील विद्यार्थीही घेऊ शकतील. वाचनालयात मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र वर्गखोली तसेच स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध करण्यात येणार आहे. वाचनालयाच्या संपूर्ण व्यवस्थेसाठी अशासकीय संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार असून या उपक्रमासाठी संपूर्ण महापालिका क्षेत्रात जनजागृती व सर्वेक्षण करण्यात येत आहे.

एका क्लिकवर माहिती

प्रत्येक वाचनालयाच्या बॅनरवरील क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर संपूर्ण मुंबईतील २५ विभांगामध्ये सुट्टीत सुरू करण्यात येणाऱ्या वाचनालयांची माहिती गुगल मॅपसह उपलब्ध होणार आहे. मुंबईतील सर्वच विद्यार्थ्यांनी या अभिनव उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे यांनी केले आहे.

प्रवेशासाठी आवश्यक बाबीसुट्टीतील वाचनालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडे ओळखपत्र, आधारकार्ड आणि पालकांचे संमतीपत्र असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

सुट्टीत सुरू होणाऱ्या प्रभागनिहाय वाचनालयांची यादी

ए विभाग – लॉर्ड हँरिस महानगरपालिका शाळा

बी विभाग – जनाबाई आणि माधवराव रोकडे महानगरपालिका शाळा

सी विभाग – निजामपुरा महानगरपालिका शाळा

डी विभाग – गिल्डरलेन महानगरपालिका शाळा

डी विभाग – बाळाराम मार्ग महानगरपालिका शाळा

ई विभाग – न्यू भायखळा पूर्व महानगरपालिका पाटणवाला मार्ग

एफ/दक्षिण विभाग – परळ भोईवाडा महानगरपालिका शाळा

एफ/उत्तर विभाग – कोरबा मीठागर महानगरपालिका शाळा

जी/दक्षिण विभाग – डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका शाळा

जी/ उत्तर विभाग – दादर वुलन मील महानगरपालिका शाळा

एच/ पूर्व विभाग – शास्त्री नगर महानगरपालिका उर्दू शाळाएच/ पश्चिम विभाग – हसनाबाद महानगरपालिका शाळाके/ पूर्व विभाग – नित्यानंद मार्ग महानगरपालिका शाळा

के/ पश्चिम विभाग – विलेपार्ले पश्चिम महानगरपालिका शाळा

पी/ दक्षिण विभाग – उन्नत नगर महानगरपालिका शाळा

पी/ उत्तर विभाग – राणी सती मार्ग मराठी महानगरपालिका शाळा

आर/ दक्षिण विभाग – आकुर्ली महानगरपालिका मराठी शाळा क्र. १

आर/मध्य विभाग – पोईसर महानगरपालिका हिंदी शाळा क्र.३

आर/उत्तर विभाग – भरुचा रोड महानगरपालिका शाळा

एल विभाग – नेहरु नगर महानगरपालिका शाळा

एम पूर्व विभाग – शिवाजी नगर महानगरपालिका शाळा क्र. ०१

एम पूर्व २ विभाग – गोवंडी स्टेशन महानगरपालिका मराठी शाळा क्र. २

एम पश्चिम विभाग – टिळक नगर महानगरपालिका शाळा

एन विभाग – माणेकलाल मेहता महानगरपालिका शाळा

एस विभाग – म. वि. रा. शिंदे मार्ग महानगरपालिका हिंदी शाळा

टी विभाग – गोशाळा मार्ग महानगरपालिका शाळा