दादरमध्ये शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या संघर्षानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांचं परवाना असणारं पिस्तूल दादर पोलिसांनी जप्त केलं आहे. दादर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याच्या आरोपाखाली सदा सरवणकर यांच्याविरोधात रविवारी शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असून, जप्त करण्यात आलेलं पिस्तूल फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात येणार आहे.
काय आहे प्रकरण?
अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रभादेवीत सरवणकर समर्थक आणि शिवसैनिक समोरासमोर आले होते. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने त्यावेळी संघर्ष टळला, मात्र शनिवारी पुन्हा या वादाचे पडसाद उमटले होते. प्रभादेवीत शनिवारी रात्री शिंदे गट आणि शिवसैनिक समोरासमोर आले. त्यावेळी सरवणकर समर्थक आणि शिवसैनिक यांच्यात मारामारी झाली होती. पोलीस ठाण्यात आले असता सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे. तसंच शिंदे गटाचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांना मारहाण करण्यात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रभादेवीत झालेल्या प्रकरणाबाबत समाज माध्यमांवरील संदेशाचा जाब विचारण्यासाठी शिवसैनिक त्या ठिकाणी पोहचले होते. त्यातून हा वाद झाला.
याप्रकरणात दादर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. पहिल्या गुन्ह्यात महेश सावंत यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. दुसरा गुन्हा आमदार सदा सरवणकर, समाधान सरवणकर, संतोष तेलवणे आणि इतर कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आला आहे.