कुलाब्यातील फेरीवाल्यांचा हट्टाने पालिका अधिकारीही गोंधळात
कुलाब्याच्या ‘मेट्रो हाऊस’ला लागलेल्या आगीच्या निमित्ताने पालिकेने फेरीवाल्यांच्या मगरमिठीतून शहीद भगतसिंग मार्ग मोकळा करीत केवळ परवानाधारक फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास परवानगी दिली. मात्र परवानाधारक फेरीवाल्यांनी अनधिकृत फेरीवाल्यांची पाठराखण करीत पालिकेशीच संघर्ष सुरू केला आहे. अनधिकृत फेरीवाल्यांनाही व्यवसाय करू द्या, असा हट्टच या मंडळींनी धरला आहे. त्यामुळे पालिका अधिकारीही गोंधळात पडले आहेत.
कुलाबा येथील शहीद भगतसिंग मार्ग देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. हाकेच्या अंतरावर गेट-वे-ऑफ इंडिया असल्याने हा रस्ता कायम वर्दळीत हरवलेला असतो. पदपथावर एका रांगेत उभे असलेले फेरीवाल्यांचे स्टॉल्स, विक्रेत्यांचा कलकलाट आणि वस्तू खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक यांचा कल्ला कायम या मार्गावर असतो. शहीद भगतसिंग मार्गावरील ‘मेट्रो हाऊस’ला आग लागल्यानंतर पालिकेने येथील फेरीवाल्यांविरुद्ध धडक कारवाई हाती घेतली. फेरीवाल्यांचे सामान जप्त करून पालिकेच्या गोदामात जमा केले आणि हा रस्ता फेरीवालामुक्त झाला.
पालिकेने धरपकड केल्यानंतर पालिकेनेच आपल्याला फेरीव्यवसायासाठी दिलेला परवाना घेऊन काही फेरीवाल्यांनी पालिका कार्यालयात धाव घेतली. अखेर या मार्गावर व्यवसाय करण्यासाठी किती फेरीवाल्यांना परवाना देण्यात आला, याचा शोध पालिका अधिकाऱ्यांनी घेतला. या मार्गावर केवळ १२५ जणांनाच पालिकेने परवाना दिला आहे. मात्र असे असतानाही तेथे ५०० हून अधिक फेरीवाल्यांनी पथाऱ्या पसरून पदपथावर अतिक्रमण केल्याचे लक्षात आले. त्यामुळे परवानाधारकांनी पुढे यावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले. सुमारे १०१ परवानाधारक पुढे आले आणि त्यांनी आपल्याकडील कागदपत्रे सादर केली. त्यानंतर पदपथांवर एक बाय एक मीटरची आखणी करून परवानाधारकांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र हे फेरीवाले इमारतींच्या प्रवेशद्वारासमोर येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली. पालिकेने जप्त केलेले आपले साहित्य ताब्यात घेऊन काही फेरीवाल्यांनी आपापले व्यवसाय सुरू केले. पालिकेने परवानगी दिल्यानंतर काही फेरीवाल्यांनी आपले व्यवसाय सुरू केले. मात्र बहुसंख्य परवानाधारक फेरीवाल्यांनी अनधिकृत फेरीवाल्यांची पाठराखण करायला सुरुवात केली. फेरीवाल्यांसंदर्भातील प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लागत नाही, तोपर्यंत अनधिकृत फेरीवाल्यांनाही व्यवसाय करू द्यावा, अशी भूमिका परवानाधारक फेरीवाल्यांनी घेतली आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत फेरीवाल्यांना थारा द्यायचा नाही असा निर्धार पालिकेने केला आहे. त्यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांसाठी परवानाधारक फेरीवाले आणि पालिका यांच्यामध्ये संघर्ष शिगेला पोहोचण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
कुलाबा परिसरातील रहिवासी आणि कार्यालयांमधील कर्मचारी पालिकेच्या कारवाईमुळे खूश झाले आहेत. फेरीवाल्यांचा कलकलाट, ग्राहकांची गर्दी यामुळे पदपथांवरून चालताच येत नव्हते. वाहनांच्या गर्दीमुळे रस्त्यावरूनही चालणे अवघड बनत होते. तसेच काही वेळा ग्राहक आणि फेरीवाल्यांमध्ये शाब्दिक चकमकी उडून वादावादीचे प्रसंग निर्माण होत होते. मात्र आता फेरीवाल्यांच्या अतिक्रमणातून पदपथ मुक्त झाल्यामुळे पादचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा