मुंबई : टय़ुबेरस स्क्लेरोसिसच्या या दुर्मीळ आजाराने ग्रस्त असलेल्या २९ दिवसांच्या बालकाला कर्करोगावरील औषध देऊन वाचविण्यात बाई जेरबाई वाडिया रुग्णालयाला यश आले. हा आनुवंशिक आजार असून त्यात हृदयासह शरीरात एकापेक्षा अधिक गाठी निर्माण होतात. कर्जतपासून १२ किलोमीटरवरील गुढवण येथे राहणाऱ्या कविता कांदवी यांचे बाळ जन्माला आल्यावर रडले नाही.बाळाच्या हृदयाची गतीही खूप जास्त होती. स्थानिक डॉक्टरांकडे उपचार करूनही प्रकृती न सुधारल्याने त्यांनी बाळाला वाडिया रुग्णालयात दाखल केले. त्या वेळी त्याची प्रकृती गंभीर होती. दर मिनिटाला २३० ठोके पडत होते. हृदयविकाराच्या अनियंत्रित गतीमुळे हृदय निकामी होण्याचा धोका होता.

तपासणीत बाळाच्या हृदयात रॅबडोमायोमाच्या वैशिष्टय़ांसह अनेक लहान-मोठय़ा गाठी दिसून आल्या. हृदयाची पोकळी व्यापणारे आणि जीवघेण्या रॅबडोमायोमा गाठी दहा लाखांमागे एखाद्या बालकांत आढळतात. बाळामध्ये या गाठी असंख्य आणि वेगवेगळय़ा आकाराच्या होत्या. यातील एक गाठ तीन सेंटिमीटरची होती. गाठ खूप मोठी असल्याने आणि बाळाचे शरीरही कमकुवत असल्याने शस्त्रक्रिया करून काढणे शक्य नव्हते. बाळाचे प्राण वाचवण्यासाठी फारसे पर्याय उरले नसल्यामुळे, त्याच्यावर ‘एव्हरोलिमस’ नावाच्या औषधाने उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवजात अर्भकावर कर्करोगविरोधी औषध प्रभावशाली ठरले आणि पुढील काही दिवसांत गाठीचा आकार कमी होऊ लागला आणि हृदयाची गतीही नियमित झाली. बाळाची प्रकृतीही स्थिरावली, असे रुग्णालयातील वरिष्ठ बाल हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जयश्री मिश्रा यांनी सांगितले.

‘एव्हरोलिमस’ हे कर्करोगविरोधी औषध शरीराच्या प्रतिकारशक्तीवर दबाव आणण्यासाठी ओळखले जाते. त्यामुळे बालकाला रोगप्रतिबंधक प्रतिजैविके देण्यात आली आणि तीन आठवडय़ांनंतर सर्व लहान गाठी निघून गेल्या, तर सर्वात मोठी गाठ एक सेंटीमीटरने कमी झाल्याचे दिसून आले. दुर्मीळ आजारावरील उपचार करणे कुटुंबीयांना परवडणारे नव्हते. परंतु रुग्णालयाने मदतीचे हात देत मोफत उपचार केल्यामुळे बाळाचे प्राण वाचल्याचे बाळाची आई कविता यांनी व्यक्त केले.

आजार नेमका काय आहे?
रॅबडोमायोमा हे मल्टिपल आणि डिफ्यूज हे टय़ूबेरस स्क्लेरोसिस नावाच्या आनुवंशिक स्थितीशी संबंधित आजार आहे. टय़ूबेरस स्क्लेरोसिस असलेल्या ५० टक्के रुग्णांमध्ये रॅबडोमायोमा होतो. टय़ूब२रस स्क्लेरोसिसमुळे हृदय, त्वचा, डोळे, किडनी आणि मेंदू यासारख्या अनेक ठिकाणी सौम्य गाठी होतात. वैद्यकीय क्षेत्रातील दिवसेंदिवस प्रगती होत असली तरीदेखील रॅबडोमायोमावर उपचार करणे आव्हानात्मक आहे. या बाळावर नवीन औषधाने यशस्वी उपचार करण्यात आल्याचे रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले.