उल्हासनगरचा माजी आमदार आणि नगरसेवक सुरेश बुधरमल ऊर्फ पप्पू कलानी याच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी शिक्कामोर्तब केले. तो जामिनावर बाहेर होता. कलानी याच्यासह आणखी तीन जणांची शिक्षाही न्यायालयाने कायम केली.
कल्याण सत्र न्यायालयाने इंदर भटिजा हत्या प्रकरणात पप्पूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या विरोधात त्याने उच्च न्यायालयात अपील केले होते. या हत्येशी आपला थेट संबंध असल्याचा वा खुनाच्या कटात आपला सहभाग असल्याचा कुठलाही पुरावा पोलिसांतर्फे सादर करण्यात आलेला नाही, असा दावा करीत त्याने कल्याण सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती अनिल मेनन यांच्या खंडपीठासमोर कलानी आणि अन्य तिघांच्या अपिलावर सुनावणी झाली. कनिष्ठ न्यायालयाने त्यांना कटकारस्थानाच्या आरोपात दोषी ठरविण्यात काहीही चूक केलेली नसल्याचे स्पष्ट करीत खंडपीठाने मंगळवारी कलानीसह बच्ची पांडे, बाबा ग्रॅबिएल आणि मोहम्मद असरत या तिघांचे अपील फेटाळून लावत त्यांची शिक्षा कायम केली.
२७ फेब्रुवारी १९९० रोजी घन:श्याम भटिजा यांची उल्हासनगर येथील पिंटो रिसोर्टजवळ हत्या झाली होती. या हत्येचा साक्षीदार असलेला भटिजाचा भाऊ इंदर याचीही पोलीस संरक्षण असताना २८ एप्रिल १९९० रोजी हत्या झाली होती. राजकीय शत्रुत्वातून भटिजा बंधूंची हत्या करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी याप्रकरणी कलानी, बच्ची पांडे, बाबा ग्रॅबिएल आणि मोहम्मद असरत, डॉ. नरेंद्र रामसिंघानी आणि रिचर्ड यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

Story img Loader