वाशी येथील लोटस रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या महिलेस गुंगीचे इंजेक्शन देऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या डॉक्टरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
विशाल बने, असे शिक्षा झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. दोन वर्षांपुर्वी पिडीत महिला कुटूंबासोबत नवी मुंबई भागात दुर्गा पुजेसाठी जात असताना तिला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे कुटूंबियांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, तिला अतिदक्षता विभागात दाखल करून घेतले. त्यावेळी रात्रपाळीला असलेल्या डॉ. विशाल बने याने नर्सला बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर अतिदक्षता विभागाचा दरवाजा आतमधून बंद करून पिडीत महिलेस गुंगीचे इंजेक्शन दिले व तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी पिडीत महिलेने नवऱ्याला याबाबत सांगितले असता, त्याने  विशाल यास मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले . सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी वकील संध्या बच्छाव यांनी युक्तीवाद केला. न्यायालयात १२ साक्षीदार, डॉक्टर, नर्स यांची साक्ष तपासली. साक्षी पुरावे ग्राह्य़ मानून न्यायधीश सावंत यांनी डॉक्टरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.