मुंबई : वैद्याकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने वैद्याकीय महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थी जीवनचक्र व्यवस्थापन प्रणाली’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रणाली सिंधुदुर्ग शासकीय वैद्याकीय महाविद्यालयात पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे.

शासकीय वैद्याकीय महाविद्यालयांमधून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून विविध प्रमाणपत्रे, दस्ताऐवज मिळविण्यात अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशासनाकडे वारंवार विनंती करावी लागते. प्रमाणपत्रे मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाबरोबरच वैद्याकीय व्यवसाय करण्यास अडचणींचा सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

वैद्याकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील राज्यामध्ये २५ शासकीय वैद्याकीय महाविद्यालय, तीन दंत महाविद्यालय, पाच परीचर्या महाविद्यालय, एक व्यवसायोपचार व भौतिक महाविद्यालय, सहा आयुर्वेद महाविद्यालय आणि एक होमिओपॅथी महाविद्यालय कार्यरत आहेत. या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना विविध माहिती व शैक्षणिक उपक्रमाशी निगडीत बाबी विनाविलंब आवश्यकतेनुसार उपलब्ध व्हाव्यात यासाठी वैद्याकीय शिक्षण विभागाने एक कार्यप्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सी -डॅक या शासनाच्या कंपनीच्या माध्यमातून ‘विद्यार्थी जीवनचक्र व्यवस्थापन प्रणाली’ विकसित करण्यात आली आहे.

पथदर्शी प्रकल्प राबवणार

सी-डॅकच्या माध्यमातून बनविण्यात आलेल्या या प्रणालीची सर्व वैद्याकीय, दंत, आयुर्वेद, नर्सिंग, होमिओपॅथी व भौतिक व व्यवसायोपचार महाविद्यालयांमध्ये लागू करण्यापूर्वी त्याची योग्य तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रकल्प सध्या सिंधुदुर्गातील शासकीय वैद्याकीय महाविद्यालयात पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार असल्याचे वैद्याकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.