मुंबई : बंगालच्या उपसागरातील ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे संपूर्ण राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, काही भागात आज पहाटेच हलक्या सरी कोसळल्या.
बंगालच्या उपसागरातील ‘फेंगल’ चक्रीवादळाचा परिणाम मुंबईतील वातावरणावरही झाला आहे. मागील दोन – तीन दिवसांपासून मुंबईत ढगाळ वातावरण आहे. दरम्यान राज्यातील काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज होता. मात्र मुंबईतही पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली नव्हती. मात्र, बुधवारी पहाटे दादर, वांद्रे, सांताक्रूझ आणि पवई परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. याचबरोबर पुढील काही तासांत आणखी काही भागांत हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबईत काही दिवसांपूर्वी थंडीची चाहूल लागली होती.मात्र, मागील दोन – तीन दिवसांपासून मुंबईत पुन्हा उकाडा जाणवू लागला आहे. तसेच वातावरण ढगाळ आहे.दरम्यान, डिसेंबर महिन्यात देशभरात अपेक्षित थंडी पडण्याची शक्यता नाही, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. नोव्हेंबर महिन्याअखेरीस राज्यात गारठा वाढल्याने किमान तापमानाचा पारा घसरला होता. मात्र, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे ढगाळ वातावरण झाले असून राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. यामुळे राज्यात अनेक भागात गुलाबी थंडीची प्रतीक्षा कायम आहे.
हेही वाचा…हिंदुत्वापासून दुरावल्याचा अपप्रचार खोडून काढा; उद्धव ठाकरे यांचा माजी नगरसेवकांना आदेश
फेंगल चक्रीवादळाचा परिणाम
‘फेंगल’ चक्रीवादळामुळे थंडीत घट झाली आहे. या चक्रीवादळाचा एकूणच वातावरणावर परिणाम झाला आहे. यामुळे राज्यात तापमानातील वाढ कायम राहून काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव या भागात आज हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर याच भागात गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून यावेळी ३० -४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.