मुंबई : महाराष्ट्राला शूरवीरांचा गौरवशाली इतिहास लाभला असून अनेक महापुरुषांनी महाराष्ट्र घडविला आहे. अशा या महाराष्ट्राचा आणि शूरवीरांचा, महापुरुषांचा, नेत्यांचा गौरवशाली इतिहास आता राज्यातील विविध पर्वतरांगांवर शिल्पाच्या रुपात मांडण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पर्वतरांगांवर इतिहास जतन करण्याची ही अनोखी संकल्पना मांडली आहे. आता ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणे तसेच सविस्तर आराखडा तयार करण्याकरिता सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नुकत्याच निविदा मागविण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात रस्ते विकास करणाऱ्या एमएसआरडीसीने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एमएसआरडीसीने आता पर्वतरांगांवरील खडकांवर शिल्पाच्या रूपात महाराष्ट्राचा इतिहास जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘माउंटन रशमोर’च्या धर्तीवर ही संकल्पना मांडण्यात आली आहे. जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, थिओडोर रुझवेल्ट आणि अब्राहम लिंकन या चार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची भव्य शिल्पे दक्षिण डकोटा राज्यातील पर्वतरांगांवर कोरण्यात आली आहेत. त्यानुसार राज्याचा इतिहास सांगणारी शिल्पे आता पर्वतरांगांवर कोरण्यात येणार आहेत.

ही शिल्पे सह्याद्रीसह आणखी कुठे साकारता येतील याचा शोध घेण्यासाठी, हा प्रकल्प व्यवहार्य ठरेल का? हे तपासण्यासाठी तसेच पुढे याचा आराखडा तयार करण्यासाठी एमएसआरडीसीने सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नुकतीच निविदा जारी केली आहे.