आमदार सत्यजीत तांबे यांनी गुरुवारी विधानपरिषदेमध्ये अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभाग घेतला. यावेळी ते म्हणाले की, राज्याचा उत्पादन शुल्क विभाग राज्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी अत्यंत सक्षम आहे. मात्र या विभागामध्ये काही त्रूटी असून त्या दूर करणे गरजेचे आहे. तांबे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, महाराष्ट्राच्या उत्पादन शुल्क विभागातून ६० हजार कोटींचं उत्पन्न निघू शकतं. मात्र, त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल आणि चोरी थांबवावी लागेल.
सत्यजीत तांबे यांनी आपल्या भाषणामध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या कामगिरीचे कौतुक केले. ते म्हणाले, “उत्पादन शुल्क खात्याच्या माध्यमातून २०११-१२ या वर्षात ८ हजार ६०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्याचवेळी उत्तर प्रदेशला ८ हजार १३९ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. २०२३-२४ साली महाराष्ट्राला या खात्यातून २५ हजार २०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले तर उत्तर प्रदेशला याच खात्यातून मिळणारे उत्पन्न हे ५८ हजार कोटी रुपयांवर गेले आहे. महाराष्ट्राच्या उत्पादन शुल्क विभागातून ६० हजार कोटींचं उत्पन्न निघू शकतं. मात्र त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल आणि चोरी थांबवावी लागेल.
हेही वाचा- बुरा ना मानो होली है! होळीच्या निमित्ताने सत्यजीत तांबेंचा राहुल गांधींना सल्ला, म्हणाले…
दरम्यान, सत्यजीत तांबे यांनी आपल्या भाषणात राज्याचे सौर उर्जेसाठीचे धोरण नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले. याशिवाय वीज खरेदी करारही झाले नसल्याचे ते म्हणाले. इतर राज्यांशी तुलना करून दाखवताना महाराष्ट्र राज्य हे सौर उर्जा प्रकल्पांमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत मागे असल्याचे सत्यजीत तांबे यांनी सदनात म्हटले. सौर उर्जेवरचा अवलंब वाढवल्यास राज्याला दीर्घकाळासाठी त्यातून उत्पन्नही मिळेल आणि राज्य पर्यावरणपूरक होण्यासाठीही एक पाऊल पुढे टाकेल, असंही ते यावेळी म्हणाले.