मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परीघात येणाऱ्या १५ हजार इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास हक्क हस्तांतर (टीडीआर) देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात केल्यानंतर याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली. मात्र उपनगरात लागू असलेले कमाल चटईक्षेत्रफळ लागू करीत मर्यादा आणल्याने या इमारतींचा पुनर्विकास होण्याची शक्यता कमी असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

एअरपोर्ट फनेलबाधितांसाठी विकास नियंत्रण नियमावलीत ३३(२६) हा नवा खंड अंतर्भूत करण्यात आला आहे. त्यानुसार सूचना जारी करण्यात आली असून हरकती व सूचना सादर करण्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली. सध्या उपलब्ध असलेल्या चटईक्षेत्रफळाइतके बांधकाम करून या बांधकामाचा खर्च निघेल इतका टीडीआर देण्याची मागणी या रहिवाशांनी केली होती. मात्र ती मान्य करण्यात आलेली (पान ४ वर) (पान १ वरून) नाही. विकास नियंत्रण नियमावलीतील ३० कलमान्वये लागू असलेले मूळ चटईक्षेत्रफळ आणि त्यावर रस्त्याच्या रुंदीप्रमाणे मिळणारा टीडीआर लागू करण्यात आला आहे. त्यात या इमारतींचा पुनर्विकास होणे शक्य नाही, असे या रहिवाशांचे म्हणणे आहे.

विमानतळाभोवती असलेल्या विलेपार्ले, सांताक्रूझ आणि कुर्ला तसेच वाकोला, धारावी आदी परिसरांतील ‘एअरपोर्ट फनेल’बाधित इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न पहिल्यांदा नोव्हेंबर २०१६ मध्ये उपस्थित करण्यात आला. या परिसरात इमारतीच्या उंचीवर बंधने असल्यामुळे पुनर्विकास ठप्प झाला. तेव्हापासून स्थानिक आमदार पराग अळवणी तसेच माहिती तंत्रज्ञानमंत्री आशीष शेलार हा विषय सातत्याने विधिमंडळात उपस्थित करीत आहेत. परंतु रहिवाशांच्या मूळ मागणीकडेच दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. झोपडीवासीयांना चार इतके चटईक्षेत्रफळ मिळू शकते. परंतु विमानतळ येण्याआधीपासून आमच्या इमारती असतानाही विचार केला जात नाही, हे अनाकलनीय असल्याचे या रहिवाशांचे म्हणणे आहे.

फनेल इमारतींची सद्यास्थिती

सांताक्रूझ पूर्व-पश्चिम, विलेपार्ले पूर्व-पश्चिम, कुर्ला, घाटकोपर या उपनगरांतील इमारतींना सांताक्रूझ आणि पवन हंस या विमानतळांचे फनेल झोन (विमानाचे उड्डाण आणि उतरण्याच्या मार्गावरील परिसर) लागू आहेत. या फनेलमध्ये येणाऱ्या इमारतींच्या उंचीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियम लागू आहेत. दोन ते तीन मजल्यांपर्यंतच उंचीची मर्यादा असल्यामुळे या इमारतींना लागू करण्यात आलेल्या एक चटई क्षेत्रफळात या इमारतींचा पुनर्विकास होणे अशक्य आहे.

टीडीआर म्हणजे?

एखाद्या भूखंडावर संपूर्ण चटईक्षेत्रफळ वापरता येणे शक्य नसते तेव्हा ते इतरत्र वापरण्याची मुभा दिली जाते. त्यालाच टीडीआर म्हणतात.