मुंबई : बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफरीमध्ये तब्बल १४ वर्षांनी सिंहाच्या छाव्याचा जन्म झाला. सिंह सफारीमधील ‘मानसी’ नावाच्या मादी सिंहाने गुरुवारी रात्री एका छाव्याला जन्म दिला.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सिंह सफारीसाठी गुजरातहून आणलेली ‘मानस’ आणि ‘मानसी’ ही सिंहाची जोडी पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. सिंहाची ही जोडी २०२२ मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली होती. मात्र, या जोडीमध्ये ताणतणाव असल्यामुळे त्यांच्यात मिलन होत नव्हते.
मध्यंतरी मानसी आजारी होती. दरम्यान, मागील वर्षी उद्यानातील पथकाने मानसी आणि मानस यांच्या मिलनसाठी प्रयत्न सुरू केले होते. नोव्हेंबर २०२४ मध्ये तपासणीअंती मानसी गरोदर असल्याचे समजले. गुरुवार, १६ जानेवारी रोजी रात्री मानसीने एका छाव्याला जन्म दिला. छावा आणि मानसी दोघे सुखरूप असून सध्या दोघेही वन कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली आहेत.
दरम्यान, संजय गांधी राष्ट्री उद्यानात २००९ मध्ये रवींद्र आणि शोभा ही सिंहाची जोडी आणण्यात आली होती. गोपा आणि जेस्पा हे या जोडीचे छावे. सिंहाचे हे चौकोनी कुटुंब गेली अनेक वर्षे पर्यटकांसाठी आकर्षण ठरले होते. काही वर्षांपूर्वी शोभाचा मृत्यू झाला. त्यानंतर २०२१ मध्ये गोपा आणि रवींद्र, तसेच जेप्सा यांचा २०२२ मध्ये मृत्यू झाला. याचदरम्यान २०२२ मध्ये गुजरातमधून ‘मानस’ आणि ‘मानसी’ या जोडीला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते.
© The Indian Express (P) Ltd