मुंबई : गुजरातमधील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातील सिंहाची जोडी शुक्रवारी सकाळी ६.३० च्या सुमारास बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली. तब्बल १२ तास प्रवास करून सिंहाची जोडी राष्ट्रीय उद्यानात पोहोचली. सिंहांच्या बदल्यात राष्ट्रीय उद्यानातील ‘बजरंग’ आणि ‘दुर्गा’ ही वाघांची जोडी सक्करबाग प्राणिसंग्रहालयाला देण्यात येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कनिष्ठ न्यायालयाच्या ‘जैसे थे’ आदेशामुळे दापोलीतील साई रिसॉर्टवरील कारवाई नाही

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील १९७५-१९७६ मध्ये सिंह सफारी सुरू करण्यात आली होती. ही सफारी पर्यटकांचे मुख्य आकर्षण आणि उद्यानाच्या महसुलाचा मुख्य स्रोत आहे. सिंह सफारीमुळे उद्यानाच्या महसुलात वाढ झाली होती. सर्कसमधील आशियाई आणि आफ्रिकन सिंहांपासून जन्मलेले संकरित सिंह त्यावेळी राष्ट्रीय उद्यानात होते.  केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) तपासणीनंतर संकरित सिंहाच्या प्रजननास मनाई केली होती. यामुळे कालांतराने सिंहांची संख्या कमी झाली.

हेही वाचा >>>मध्य रेल्वेवरील प्रवाशांना १५ डबा लोकलच्या वाढीव फेऱ्यांची प्रतीक्षा

राष्ट्रीय उद्यानातील ‘रवींद्र’ या १७ वर्षांच्या सिंहाचा ऑक्टोबर २०२२ मध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर तेथे एकच नर सिंह शिल्लक राहिला. परिणामी, उद्यानात ११ वर्षांचा एकच ‘जेप्सा’ नावाचा नर सिंह शिल्लक असून वृद्धापकाळामुळे  आजारी असलेल्या ‘जेप्सा’चे पर्यटकांना दर्शन घडविणे अवघड बनले आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालयाने दिलेल्या परवानगीनुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘बजरंग’ आणि ‘दुर्गा’ ही वाघांची जोडी गुजरातमधील सक्करबाग प्राणिसंग्रहालयात पाठविण्यात येणार असून त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. बजरंग (६) आणि दुर्गा (३) यांना चंद्रपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून पकडण्यात आले होते. सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून आणलेल्या सिंहाचा जन्म जंगलातून पकडलेल्या सिंहापासून झाला असून त्याचे वय ३ वर्षे आहे, अशी माहिती राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lion couple from gujarat reached in sanjay gandhi national park mumbai print news zws