मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात २६ जानेवारी रोजी गुजरात येथील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून सिंहाच्या जोडीला आणण्यात आले आहे. दरम्यान, सिंहाच्या जोडीच्या बदल्यात राष्ट्रीय उद्यानाकडून वाघाची जोडी सक्करबाग प्राणिसंग्रहालयाला देण्यात येणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सिंह सफारी आणि व्याघ्र सफारीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. याच सिंह सफारी मधील गुजरातहून आणलेली ‘मानस’ आणि ‘मानसी’ ही सिंहाची जोडी लोकप्रिय ठरली आहे.
काही दिवसांपूर्वी मानसीने एका छाव्याला जन्म दिला. सिंहाची ही जोडी २०२२ मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली होती. दरम्यान, उद्यानात आणलेल्या नवीन सिंहाची जोडी ही तीन वर्षांची आहे. या जोडीला सध्या निरिक्षण कक्षात ठेवण्यात आले आहे. काही दिवसांनी त्यांना सिंह सफारीमध्ये सोडण्यात येईल. संजय गांधी राष्ट्री उद्यानात २००९ मध्ये रवींद्र आणि शोभा ही सिंहाची जोडी आणण्यात आली होती. शोभा सिंहिणीने २०११ मध्ये दोन माद्या आणि एक नर छाव्याला जन्म दिला. ‘लिटिल शोभा, जेस्पा आणि गोपा हे या जोडीचे छावे. सिंहाचे हे कुटुंब गेली अनेक वर्षे पर्यटकांसाठी आकर्षण ठरले होते. काही वर्षांपूर्वी शोभाचा मृत्यू झाला. त्यानंतर २०२१ मध्ये गोपाचा मृत्यू झाला. तसेच २०२२ मध्ये रविंद्र आणि जेस्पा यांचाही मृत्यू झाला. त्याच दरम्यान २०२२ मध्ये गुजरातमधून ‘मानस’ आणि ‘मानसी’ या जोडीला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी या जोडीने एका छाव्याला जन्म दिला आहे. आता संजय राष्ट्रीय उद्यानातील सिंहाची एकूण संख्या ५ झाली आहे.