छटपुजेनिमित्त ३० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजल्यापासून मध्यरात्री १.३० वाजेपर्यंत जुहू आणि सांताक्रुज परिसरातील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. मुंबई उपनगर जिल्हयाच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
हेही वाचा- “राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा”; राज ठाकरेंचे शिंदे सरकारला पत्र, म्हणाले, “ऐन दिवाळीच्या तोंडावर….”
दरवर्षी मुंबईतील जुहू येथील समुद्रकिनाऱ्यावर छटपुजेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी छटपूजा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या काळात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जुहू पोलीस ठाणे व सांताक्रुज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
हेही वाचा- दादर-स्वारगेट ‘शिवशाही’ महागली ; एसटीची उद्यापासून १० टक्के हंगामी भाडेवाढ
जुहू व सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अबकारी परवानाधारकांनी आणि सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्तीधारक दुकानांमधून या कालावधीत कोणतेही व्यवहार करू नये. या कालावधीत व्यवहार सुरू असल्याचे आढळल्यास फौजदारी कारवाईबरोबरच अनुज्ञप्ती वा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा निधी चौधरी यांनी आदेशात दिला आहे.