Marathi Art Director Nitin Desai Commits Suicide : ऑस्करच्या अंतिम नामांकनात धडक मिळवणारा आशुतोष गोवारीकर यांचा ‘लगान’, ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’ अगदी अलिकडचा ‘पानिपत’ असे चित्रपट त्यांच्या कलादिग्दर्शनाशिवाय होऊच शकले नसते. संजय लीला भन्साळींच्या ‘देवदास’ चित्रपटातील देखण्या मोठमोठ्या वास्तू त्यांच्या कल्पनेतून उभ्या राहिल्या. जेव्हा जेव्हा ठरावीक काळातील वास्तू, शहरे, रचना उभारण्याचे आव्हान निर्माता-दिग्दर्शकांसमोर उभे राहिले. त्यावर नितीन चंद्रकांत देसाई हे एक उत्तर ठाम होते.
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट आणि रहेजा स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण घेतलेल्या नितीन देसाई यांनी गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रपटनगरीतून कामाला सुरूवात केली होती. नितीश रॉय या प्रसिध्द कलादिग्दर्शकाच्या हाताखाली त्यांनी पहिल्यांदा १९८७ साली ‘तमस’ या गोविंद निहलानी दिग्दर्शित मालिकेसाठी कलादिग्दर्शन केले. ‘चाणक्य’ या गाजलेल्या ऐतिहासिक मालिकेसाठी सुरूवातीला सहाय्यक म्हणून आणि नंतरचे काही भाग त्यांनी स्वतंत्रपणे कलादिग्दर्शन केले. मालिका, चित्रपट अशी सुरूवात करणाऱ्या नितीन देसाईंना बॉलिवूडमध्ये कलादिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा नावलौकिक मिळवून देणारा चित्रपट होता तो विधू विनोद चोप्रा निर्मित ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’. विधू विनोद चोप्रा यांच्याच ‘परिंदा’, ‘मिशन काश्मीर’, ‘एकलव्य’पासून पुढे राजकुमार हिरानींचे दिग्दर्शन असलेल्या ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस.’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ अशा चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. ’खामोशी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’ हे भन्साळींचे चित्रपट, ‘मंगल पांडे : द रायझिंग’, ’फॅशन’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘जेल’ हे मधुर भांडारकर यांचे चित्रपट, अशा हिंदीतील मोठमोठ्या चित्रपटांसाठी त्यांनी कलादिग्दर्शन आणि प्रॉडक्शन डिझाईनिंगचे काम केले होते.
बॉलिवूडमध्ये नामांकित दिग्दर्शकांबरोबर काम सुरू असतानाच ‘लालबागचा राजा’ सारख्या नामांकित गणेश मंडळांच्या देखाव्याचे कल्पक कामही त्यांनी सुरू ठेवले होते. पुढे याच कामाच्या जोरावर काही हॉलिवूड चित्रपटांसाठीही त्यांना कलादिग्दर्शक म्हणून बोलवण्यात आले. त्यांनी ‘सलाम बॉम्बे’, ‘कामसूत्र’, ‘जंगल बुक’, ‘सच लॉंग जर्नी’ अशा काही निवडक आंतरराष्ट्रीय चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले. त्यातही खास लक्षात राहिला तो डॅनी बोएल दिग्दर्शित ‘स्लमडॉग मिलेनिअर’ हा चित्रपट.
हेही वाचा… नितीन देसाईंनी उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी अवघ्या २० तासांत उभारला होता मंच!
डॅनी बोएल आणि कौन बनेगा करोडपती
डॅनी बोएल यांना ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटासाठी ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचा हुबेहुब सेट बनवून हवा होता. नितीन देसाई यांनी ‘कौन बनेगा करोडपती’चा पहिला सेट बनवला होता. अत्यंत हुशारीने कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाबरोबरच अन्य स्पर्धकांना बसण्यासाठी केलेली रचना, हॉट सीट, कॉम्प्युटर महाशयांना सामावून घेत अमिताभ बच्चन आणि स्पर्धक यांच्यासाठी केलेली रचना सगळ्यांच्या पसंतीची दाद मिळवून गेली होती. डॅनी बोएल यांच्या आवश्यकतेनुसार नितीन देसाई यांनी पुन्हा एकदा त्यांना चित्रिकरणासाठी आवश्यक फेरफार करून तसाच सेट बनवून दिला. या प्रत्येक आंतरराष्ट्रीय चित्रपटांसाठी ज्या ज्या दिग्दर्शकांबरोबर काम केले त्यातून सतत नवे काही शिकत गेलो, असे नितीन देसाई यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
लाल किल्ला, ताज महाल, शीश महल आणि एन. डी. स्टुडिओ…
‘जोधा अकबर’ चित्रपटासाठी नितीन देसाई यांनी लाल किल्ल्याची प्रतिकृती केली होती. ‘स्लमडॉग मिलेनिअर’ चित्रपटातील एका गाण्यासाठी ताजमहालची अंतर्गत रचना आवश्यक होती. प्रत्यक्ष त्या त्या वास्तूत चित्रीकरण करण्यासाठी परवानगी मिळत नसल्याने त्याची प्रतिकृती, सेट उभारणे ही गरज होती. ‘राजा शिवछत्रपती’ या नितीन देसाई यांचीच निर्मिती असलेल्या चित्रपटासाठी आवश्यक असलेले ऐतिहासिक सेट्स, विविध ऐतिहासिक मालिकांसाठी केलेले कलात्मक बांधकाम, ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटासाठी तयार केलेला शीश महल, नक्षीदार खांब, मोठमोठाले हत्ती, रथ, शस्त्रास्त्रे, पौराणिक-ऐतिहासिक वस्त्रे-प्रावरणे, आभूषणे अशा सगळ्या कलात्मक गोष्टींचा संग्रह त्यांनी २००५ साली कर्जत येथे ५२ एकर परिसरावरातील ‘एन. डी. स्टुडिओ’ त एकत्र केला. इथे चित्रीकरणासाठी लागणाऱ्या अन्य सोयी-सुविधा एकाच जागी उपलब्ध करून दिल्या. आणि पहिल्यांदाच मुंबईच्या बाहेर आणि तरीही त्याला लागून चित्रीकरणाचा एक भव्य पर्याय निर्माते-दिग्दर्शकांना उपलब्ध झाला. गोरेगाव येथील चित्रनगरी वगळता अशाप्रकारे पहिल्यांदाच स्टुडिओ उभा करण्याचे स्वप्न पाहणारे आणि ते सत्यात आणणारे म्हणून नितीन चंद्रकांत देसाई यांचा लौकिक अधिकच वाढला.