लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: इंग्लंडमध्ये कॅडबरीच्या काही उत्पादनांमध्ये लिस्टेरिया विषाणू सापडला आहे. त्यामुळे इग्लंड सरकारने ही उत्पादने माघारी घेण्याचे आदेश कंपनीला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कॅडबरी कंपनीच्या उत्पादकांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशन या औषध वितरकांच्या संघटनेने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे.
काही दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये कॅडबरी कंपनीच्या क्रंची, डेम, फ्लेक, डेअरी मिल्क बटन्स आणि डेअरी मिल्क चंक्स आदी उत्पादनांमध्ये लिस्टेरिया विषाणू सापडला असून त्यामुळे ही उत्पादने बाजारातून माघारी घेण्याची सूचना इंग्लंड सरकारने कंपनीला केली आहे. तसेच इंग्लंड फूड स्टॅंण्डर्ड असोसिएशनने ही उत्पादने खरेदी करू नये, तसेच खरेदी केल्यास त्याचे सेवन करू नये. जनतेने या संदर्भात सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष करून गर्भवती महिला, लहान मुले आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी ही उत्पादने खाऊ नयेत, असेही सूचित करण्यात आले आहे.
हेही वाचा… आरोग्य विभागामधील कर्मचाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया ॲपद्वारे
कॅडबरीच्या या उत्पादनांची भारतीय बाजारामध्येही मोठ्या प्रमाणात विक्री होते. त्यामुळे हा विषाणू भारतीय बाजारात विक्री होणाऱ्या उत्पादनांमध्ये असल्यास याचा मोठा फटका लहान मुलांना व महिलांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे लिस्टेरिया विषाणूची लागण मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांना होऊ नये यासाठी कॅडबरीच्या सर्व उत्पादनांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी केली आहे.
लिस्टेरियामुळे काय होतो त्रास
लिस्टेरिया विषाणूमुळे नागरिकांमध्ये तीव्र ताप, सर्दी, खोकला, स्नायू दुखणे अशी लक्षणे दिसून येतात. तसेच या विषाणूमुळे मेंदूज्वरसारखा आजारही होण्याची शक्यता आहे. मेंदूज्वरामुळे मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवतीच्या ऊतींमध्ये जळजळ होऊन नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते.