केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सनदी सेवा परीक्षेतून गेली अनेक वर्षे अस्तित्वात असलेला आणि देशभरातील बहुतांश विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीचा असलेला पाली साहित्य हा विषय वगळल्याने त्याविरुद्ध आता आणखी तीव्र प्रतिक्रया उमटल्या आहेत. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमातून पाली भाषा वगळण्याच्या निर्णयाच्या विरोधात काही बौद्ध विद्यार्थी व संघटनांनी न्यायालयात दाद मागण्याचे ठरविले आहे.
लोकसेवा आयोगाने या वर्षांपासून सनदी सेवा परीक्षेचा पॅटर्न बदलला आहे. इंग्रजी भाषेची सक्ती व हिंदी भाषेच्या अतिरेकी प्रेमामुळे प्रादेशिक भाषा वगळण्याच्या आयोगाच्या निर्णयाने देशभर खळबळ उडाली होती. संसदेतही त्याचे तीव्र प्रतिसाद उमटले होते. अखेर आयोगाला नमते घेऊन प्रादेशिक भाषा वगळण्याचा निर्णय रद्द करावा लागला. त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला, त्याचबरोबर त्यांच्या मातृभाषेतूनही परीक्षा देण्याचा मार्ग पुन्हा मोकळा झाला.
लोकसेवा आयोगाने प्रादेशिक भाषेचे स्थान कायम करताना २५ मार्च २०१३ ला काढलेल्या सुधारीत अधिसूचनेतून मात्र वैकल्पिक भाषा साहित्याच्या यादीतून पूर्वापार चालत आलेली पाली भाषा वगळली आहे. त्यामुळे सनदी परीक्षेसाठी या विषयाची निवड करणाऱ्या व विशेष करुन महाराष्ट्रातील बौद्ध समाजातील तरुणांमध्ये असंतोष पसरला आहे.
लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेसाठी भाषा साहित्य या वैकल्पिक विषयांमध्ये भारतातील आणि परदेशी भाषा अशा जवळपास २५ भाषांचा समावेश होता. त्यापैकी देशभरातील विद्यार्थ्यांची हिंदी हा पहिल्या पसंतीचा विषय, तर पाली साहित्य हा दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीचा विषय ठरला आहे. आयोगाच्या २०११-१२ च्या वार्षिक अहवालात त्याची नोंद करण्यात आली आहे. त्या वर्षांत झालेल्या सनदी सेवा परीक्षेत ९५५ विद्यार्थ्यांनी हिंदी विषय घेतला होता, त्या खालोखाल ३५१ विद्यार्थ्यांना पाली विषय निवडला होता, त्यानंतर तमिळ, तेलगू व संस्कृत विषयाला विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. ज्या इंग्रजीचा एवढा गवगला केला जातो, त्या विषयाची ३० विद्यार्थ्यांनी निवड केली होती, असे संबोंधी अकादमीने निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे लोकसेवा आयोगाला काहीही कराण नसताना पाली भाषा वगळून विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे, असा आरोप होत आहे. या संदर्भात संबोधी अकादमीच्या वतीने उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे.
‘आयएएस्’च्या मुख्य परीक्षेतून पाली भाषा हद्दपार
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सनदी सेवा परीक्षेतून गेली अनेक वर्षे अस्तित्वात असलेला आणि देशभरातील बहुतांश विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीचा असलेला पाली साहित्य हा विषय वगळल्याने त्याविरुद्ध आता आणखी तीव्र प्रतिक्रया उमटल्या आहेत.
First published on: 08-04-2013 at 03:08 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Literature of pali language out from ias main exam