मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळखण्यासाठी मदत व्हावी याकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सुरू केलेल्या ‘अटल’ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत कल चाचणीसाठी घेण्यात येणाऱ्या सायकोमेट्रिक चाचणीसाठी २४३ विद्यार्थांनी, तर सराव चाचण्यांसाठी २ हजार ५९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यावसायिक अभ्याक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांचा शोध घेता यावा यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने १६ जानेवारीपासून ‘सीईटी-अटल’ ही ऑनलाईन प्रणाली सुरू केली आहे. विद्यार्थ्यांसाठी या प्रणालीमध्ये सराव चाचण्या आणि सायकोमेट्रिक चाचण्यांचा समावेश आहे. सराव चाचण्यांमुळे प्रत्यक्ष परीक्षेचे वातावरण तयार होईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणत्या स्वरूपातील प्रश्नांना सामोरे जावे लागेल याची माहिती होईल. याव्यतिरिक्त, सायकोमेट्रिक चाचण्या वैयक्तिक क्षमता, स्वारस्य आणि योग्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी तयार केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या ‘अटल’ उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे.

सराव परीक्षा आणि सायकोमेट्रिक चाचणीसाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करणे आवश्यक असून, त्यासाठी नाममात्र शुल्क राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून आकारण्यात आले आहे. मात्र ही सुविधा सुरू करून १५ दिवस उलटले तरी आतापर्यंत अवघ्या २ हजार ८३८ विद्यार्थ्यांनी ‘अटल’साठी नाेंदणी केली आहे. यामध्ये सायकोमेट्रिक चाचणीसाठी २४३ विद्यार्थांनी तर सराव चाचण्यांसाठी २ हजार ५९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र यापैकी अवघ्या ३५४ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून नोंदणी निश्चित केली आहे. राज्यभरातून १९ वेगवेगळ्या विषयांच्या सीईटीसाठी ९ लाख २५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात आली.

बारावी व पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व्यावसायिक अभ्याक्रमांना प्रवेश घेतात. सध्या हे विद्यार्थी बारावी व पदवीच्या परीक्षेची तयारी करण्यामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. मात्र परीक्षा संपल्यावर विद्यार्थी ‘अटल’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद देतील, असा विश्वास राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.

नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या

सायकोमेट्रिक चाचणी – २४३

मॉकटेस्टसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी

एमएचटी सीईटी (पीसीबी) – २९१

एमएचटी सीईटी (पीसीएम) – ९०७

नर्सिंग – ८६

बी.एड. – १७७

एमसीए – १८२

बी.एड ईएलसीटी – ५५

एम.एड. -१७

एम.पी.एड. – २१

एमबीए/एमएमएस सीईटी – ५३९

बीसीए/बीबीए/बीएमएस/- १७८

बीए/बी.एससी बी.एड इंटिग्रेटेड सीईटी – ४२

बी.पी.एड.- २८

एम.एचएमसीटी-२०

डीपीएन/पीएचएन – १८

बी.एड.एम.एड. – १७

बी.एचएमसीटी/एम.एचएमसीटी – १७