शत-प्रतिशत भाजप या संकल्पनेच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महाराष्ट्रातील पहिल्यावहिल्या सरकारचा शपथविधी शुक्रवारी मुंबईमध्ये संपन्न झाला. भाजपच्या विधीमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. वानखेडे मैदानावर झालेल्या शानदार सोहळ्यात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी फडणवीस यांच्यासह इतर मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

सांस्कृतिक कार्यक्रमांनी या शाही शपथविधी सोहळ्याला सुरूवात झाल्यानंतर राज्यपाल विद्यासागर राव यांच्या अनुमतीने राष्ट्रगीताने शपथविधीला सुरूवात झाली. सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन या शपथविधी सोहळ्याची सुरूवात केली. त्यानंतर अनुक्रमे एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.


शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते. मोदींनी महाराष्ट्राच्या नव्या मंत्रीमंडळाला शुभेच्छा दिल्या. शिवसेना नेत्यांनी या शपथविधीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली होती. मात्र, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना फोन करून शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती केली. यानंतर अखेर सेनेच्या नाराजी नाट्यावर पडदा पडला आणि उध्दव ठाकरेंसह शिवेसेनेचे आमदार शपथविधीला उपस्थित होते. उध्दव यांनी देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडल्यानंतर व्यासपीठावर उपस्थिती दर्शविली.
रामदास आठवले, महादेव जानकर, राजू शेट्टी, विनायक मेटे हे देखील मुख्य व्यासपीठावर उपस्थित होते. शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादीचेही नेते उपस्थित होते. तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही उपस्थिती दर्शविली.
खडसे, तावडे, मुनगंटीवार, पंकजा मुंडे मंत्रिमंडळात; दिलीप कांबळेंचीही वर्णी
दरम्यान, शपथविधीच्या सुरूवातीला विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर राज्यपाल विद्यासागर राव यांच्या अनुमतीने शपथविधी सोहळ्याला राष्ट्रगीताने सुरूवात झाली. कार्यक्रमाला विविध राज्यातील भाजपचे मुख्यमंत्री, कॉर्पोरेट जगतातील दिग्गज मंडळी यांच्यासोबत बॉलिवूडमधील कलाकारही या सोहळ्यासाठी उपस्थित होते.