भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी संध्याकाळी महाराष्ट्र बंद आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी बंदला पाठिंबा दिल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. काही अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी महाराष्ट्र बंद शांततेच्या मार्गाने पार पडल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्त्ववादी संघटनांवर हल्ला चढवला. देशातील काही हिंदू संघटनांचा अराजक माजवणे हाच प्रमुख उद्देश आहे. १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथे या संघटनांनी पुन्हा तसाच प्रयत्न केला. मात्र, आजच्या आंदोलनाच्यानिमित्ताने आम्ही त्यांचा खरा अजेंडा जगासमोर आणण्यात यशस्वी ठरलो. त्यामुळे देशातील काही संघटना गोंधळ माजवण्याचेच काम करतात, हे दिसून आल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

तसेच त्यांनी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करण्याची पुन्हा एकदा मागणी केली. सरकार या सर्वांवर लवकरच कारवाई करेल आणि त्यांना अटक करेल, अशी आशा मी करतो. ज्याप्रमाणे याकुब मेमनचा मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यात अप्रत्यक्ष सहभाग असूनही घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्याच्यावर ३०२ चे कलम लावण्यात आले. तसाच न्याय भीमा कोरेगाव हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्या भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांना लावला पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
ed raids in jharkhand west bengal
बांगलादेशींचे घुसखोरी प्रकरण : झारखंड, प. बंगालमध्ये ईडीचे १७ ठिकाणी छापे, मतदानाच्या एक दिवस आधी कारवाई

आज सकाळी या बंदची सुरूवात झाली तेव्हा सुरूवातीच्या काही तासांमध्ये मुंबईत आंदोलनाचा फारसा प्रभाव जाणवत नव्हता. याउलट ठाण्यात सकाळपासूनच आंबेडकरी अनुयायांनी रेल्वे आणि रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. मात्र, पोलिसांनी लगेचच आंदोलकांना रेल्वेच्या ट्रॅक आणि रस्त्यावरून हटवत दोन्ही ठिकाणची वाहतूक सुरळीत केली. तत्पूर्वी औरंगाबादमध्ये सकाळपासूनच एसटी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. याशिवाय, येथील इंटरनेटसेवाही बंद करण्यात आली होती.

दुपारी ११ च्या सुमारास मुंबईत खऱ्या अर्थाने महाराष्ट्र बंदचे आंदोलन तापायला सुरुवात झाली. घाटकोपरच्या रमाबाई नगरमधील आंदोलकांनी रस्त्यावर उतरत पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक रोखून धरली. त्यामुळे दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली होती. याशिवाय, विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोड आणि पवई येथे आंदोलकांनी काही वाहनांची तोडफोड केली. तसेच एलबीएस मार्गावरील आर सिटी मॉलजवळही आंदोलकांनी रस्त्यावर टायर पेटवून वाहतूक रोखून धरण्याचा प्रयत्न केला. यानंतर आक्रमक झालेल्या आंदोलकांनी घाटकोपर रेल्वे स्थानक गाठून सर्वप्रथम मध्य रेल्वेच्या ट्रेन्स अडवल्या. आंदोलनाची वाढती धग पाहता मेट्रो प्रशासनाने एअरपोर्ट रोड ते घाटकोपरपर्यंतची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच डोंबिवली स्टेशन आणि कल्याण दरम्यान पत्री पुलाजवळही लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या रोखण्यात आल्या होत्या. दुसरीकडे, कांजुरमार्ग स्टेशनवर मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. ५० ते ६० जणांनी स्थानकावरील साईन बोर्ड, पोस्टर, स्टीलच्या खुर्च्या, पाणी प्यायचं मशिन, ट्यूबलाईट्स यांची तोडफोड केली.

ठळक घडामोडी

* आंबेडकरी संघटनांचा महाराष्ट्र बंद मागे; प्रकाश आंबेडकर यांची घोषणा
* डोंबिवली स्थानकात तिकीट खिडकीची तोडफोड
* आंदोलनांमुळे मुंबईतील मल्टिप्लेक्समधले आणि सिंगल स्क्रिन थिएटरमधल्या चित्रपटांचे शो रद्द
* कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात आंदोलकांकडून तोडफोड, खुर्च्या, लाइट आणि पिण्याच्या पाण्याचे मशिन फोडले
* मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प. मध्य रेल्वेवर ठाणे, घाटकोपर, विक्रोळी आणि डोंबिवलीत आंदोलन सुरू. पश्चिम रेल्वेवर दादर, एल्फिन्स्ट, गोरेगाव आणि मालाडमध्ये आंदोलन सुरू
* मुंबई विद्यापीठाकडून आजच्या परीक्षा रद्द; १३ विषयांचे पेपर पुढे ढकलले
* दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या विरोधात जोरदार निदर्शने

मुंबईच्या सातरस्ता परिसरात शुकशुकाट
महाराष्ट्र बंद आंदोलनाचा रस्ते वाहतुकीवर परिणाम; मुंबईतील रस्ते ओस पडले.

* डोंबिवली स्थानकात तिकीट घराची तोडफोड
* जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवरील वाहतूक सुरु
* नागपूर येथे शताब्दी चौक, रिंग रोड येथे युवकांची घोषणा करत रिंग रोड बंद करण्याचा प्रयत्न.


* दादर रेल्वे स्थानकात आंदोलकांची घोषणाबाजी


* गोरेगाव येथे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे रोखताना आंदोलनकर्ते

* वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आंदोलकांचे ‘रास्ता रोको’

* दादर रेल्वे स्थानकाबाहेरही आंदोलकांची गर्दी. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस यंत्रणांचे शर्थीचे प्रयत्न

* दादर रेल्वे स्थानकात आंदोलक रेल्वे रुळावर

* एरव्ही गजबजलेला पवईतील या रस्त्यावरही आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळत आहेत.

* पवई परिसरात बेस्ट बस आणि एका कारची तोडफोड

* पश्चिम रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरु

*डोंबिवली स्थानकात आंदोलकांनी एक्स्प्रेस रोखली



*चेंबूरमध्ये मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर


*ठाण्यात चेंदणी कोळीवाडा परिसरात रिक्षा आणि टीएमटी बसची तोडफोड, चार प्रवासी किरकोळ जखमी

*इन्फिनिटी मॉल परिसरातही आंदोलकांची गर्दी


*घाटकोपर, असल्फादरम्यान आंदोलकांनी मेट्रो रोखली
* घाटकोपर रेल्वे स्थानकात आंदोलक ट्रॅकवर; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
*महाराष्ट्र बंद आंदोलनामुळे मुंबई मेट्रोची घाटकोपर ते एअरपोर्ट रोडपर्यंतची वाहतूक बंद
*पवईजवळ अनेक वाहनांच्या काचा फोडल्या
*जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवर तोडफोड

*वरळी नाक्यावर आंदोलकांचा रास्तारोको
*नालासोपारा इथे सकाळी दहाच्या सुरामास लोकल वाहतूक अडवण्याचा आंदोलकांचा प्रयत्न
*विरार पाठोपाठ गोरेगाव इथे लोकल गाडी अडवत आंदोलन करण्यात आले, मात्र सध्या वाहतूक सुरळीत
*रायगड, खोपोली, माणगाव आणि पेणमध्ये बंद

*पालघरमध्ये कडकडीत बंद
*कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्ये रिक्षा बंद

*स्वारगेट बस स्थानकात शुकशुकाट, पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ
*भीमा कोरेगाव प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज संसदेत माहिती देण्याची शक्यता
*दादरमधील फुल बाजारात व्यवहार सुरू
*दादरमध्ये परिस्थिती अगदी सुरळीत, सर्व व्यवहार चोख सुरू, बंदचा कुठलाही परिणाम नाही

*मुंबईतील सेंट झेव्हियर्स कॉलेजची अकरावीची कला, विज्ञान शाखेची आजची परीक्षा रद्द
*मुलुंड चेकनाका परिसरात आंदोलकांनी बेस्ट बसची हवा सोडली, लोकांना बसमधून उतरवलं

* ठाण्यात आंदोलकांना रुळावरून हटवले, मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत
* मुंबईत बेस्टची वाहतूक सुरळीत
* ठाणे रेल्वे स्टेशन येथील एसटी आगारामधून मागील १५ मिनिटांपासून बसेसची वाहतूक बंद
* ठाण्यातील निळकंठ टॉवर येथे टीएमटी बसवर दगडफेक; हल्लेखोर बाईकवरून पळाले.
* मध्य रेल्वेमार्गावरील ट्रेन्स २० मिनिटे उशिराने धावत आहेत
* भीमा कोरेगाव हिंसाचारामागे खूप मोठे षडयंत्र- मायावती
* संघ परिवार आणि भाजपाला दलितांनी सन्मानाने जगू नये असे वाटते- मायवती
* दलितांमध्ये भीती, असुरक्षितता निर्माण झाली आहे, ही भावना दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न करणं गरजेचं आहे- मायावती
* ठाण्यात महाराष्ट्र बंद आंदोलनाची जोशात सुरुवात
* मुंबईतील काही खासगी शाळांना सुट्टी जाहीर
* औरंगाबाद, अकोल्यात आज शाळा बंद
* ठाण्यात तीन हात नाक्यावर आंदोलकांनी वाहने अडवल्यामुळे वाहतूक कोंडी
* चेंबूरच्या आरसीएफ परिसरात स्कूल बसेसची तोडफोड
* कल्याण स्थानकात सकाळच्या वेळेत शुकशुकाट
* औरंगाबादमध्ये एसटीची सेवा ठप्प; इंटरनेटसेवाही खंडित

* विरारच्या फलाट क्रमांक ३ वर आंदोलकांनी लोकल ट्रेन रोखली
* मुंबईत टॅक्सी आणि रिक्षा बंद राहण्याची शक्यता
* महाराष्ट्र बंदला रिक्षा-टॅक्सी संघटनांचा पाठिंबा, तर कडेकोट बंदोबस्तात एसटी सुरु, तोडफोड न करण्याचे परिवहनमंत्र्यांचे आवाहन
* मुंबईतील शाळा आणि महाविद्यालये सुरू; मात्र स्कूल बस बंद
* मुंबईत बेस्टच्या बसेस सुरू
* चेंबूर, वरळी नाका परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
* चेंबूर परिसरातील रस्त्यांवर शुकशुकाट; दुकाने बंद

* आंदोलकांनी टीएमटी आणि एसटी बस रोखल्या; ठाणे स्थानकाच्या परिसरात वाहतूक कोंडी
* आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
* ठाण्यात फलाट क्रमांक १ आणि फलाट क्रमांक २ वर आंदोलनाला सुरूवात
* भीमा कोरेगाव हिंसाचार: ठाण्यात आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरले
* भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि दलित संघटनांकडू आज महाराष्ट्र बंदची हाक