मुंबई: गेल्या काही वर्षात तरुणांमध्ये विशेषतः टाइप २ मधुमेह असलेल्यांना हिपॅटायटीस, फॅटी लिव्हर आणि सिरोसिससारखे यकृताचे आजार होताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मधुमेहींमध्ये यकृताशी संबंधित गुंतागुंतीची वाढती संख्या हे चिंतेचे कारण ठरत असून वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे तरुणांमध्ये नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज आणि लिव्हर सिरोसिसच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. तज्ज्ञ सांगतात की मधुमेह हा यकृताचे नुकसान करतो ज्यामुळे यकृताला जखमा (फायब्रोसिस) होतात आणि जर त्याचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर सिरोसिसची समस्या होते. म्हणूनच, दीर्घकालीन यकृताचे नुकसान टाळण्यासाठी आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी वेळीच तपासणी, जीवनशैलीत बदल आणि मधुमेहाचे नियंत्रण करणे आवश्यक आहे.

लठ्ठपणा, मधुमेह, फॅटी लिव्हर आणि उच्च कोलेस्ट्रॉलने पिडीत रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ते साथीच्या रोगांप्रमाणे वाढू लागले आहेत (जगातील लोकसंख्येच्या एकतृतियांशपेक्षा जास्त लोक प्रभावित झाले आहेत). यकृताचे विकार हा प्रौढांमधील आजार राहिलेला नाही तर तरुणांमध्येही या आजाराने पिडीत रुग्णांची संख्या वाढत आहे. मेटाबॉलिक डिसफंक्शन अ‍ॅसोसिएटेड लिव्हर डिसीज मुळे प्रगत यकृताचे रोग (सिरोसिस, यकृतास होणारी जखम) होऊ शकतात आणि वेळीच उपचार न केल्यास ते यकृताच्या कर्करोगास कारणीभूत ठरतात. सुरुवातीच्या टप्प्यात हे आजार रोखता येतात आणि बरे देखील होतात. तरुणांमध्ये यकृताच्या आजारात वाढ होण्याची काही कारणे जीवनशैलीशी संबंधित आहेत जसे की एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहणे, बैठी जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव, पुरेशी झोप न घेणे, खाण्याच्या सवयी (अल्ट्रा-प्रोसेस्ड फुड, आहारातील कार्बोहायड्रेट्सचे वाढते प्रमाण) आणि व्यसन (अल्कोहोलचे सेवन). वर्तमानकाळात तुम्ही जो आहार घेता तो भविष्यात तुमच्या यकृताचे आरोग्य ठरवते असे लीलावती रूग्णालयाच्या प्रमुख यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी सर्जन डॉ. विभा वर्मा यांनी सांगितले.

टाइप २ मधुमेह असलेल्या २३ ते ३५ वयोगटातील तरुणांमध्ये यकृताशी संबंधित गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असते. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज ही देखील एक चिंतेची बाब आहे जी वर्षानुवर्ष यकृतावर परिणाम करते. वेळीच उपचार न केल्यास, त्याचे रुपांतर लिव्हर सिरोसिसमध्ये होऊ शकते जे कायमस्वरुपी टिकून राहते आणि तितकेच धोकादायक असते. ५०% तरुणांमध्ये रक्तातील साखरेची पातळी असामान्य असल्याचे दिसून येते. मधुमेह असलेल्या तरुणांमधील यकृताच्या समस्यांमध्ये सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका महिन्यात, यकृत निकामी झालेल्या १० पैकी ५ रुग्णांना मधुमेह होतो आणि त्यांना ठराविक औषधे आणि वजन नियंत्रित राखणे, पौष्टिक आहार घेणे आणि दररोज व्यायाम करणे यासारख्या जीवनशैलीतील बदलांसह उपचारांचा सल्ला दिला जातो. मधुमेह असलेल्यांमध्ये यकृताच्या समस्या टाळण्यासाठी जीवनशैलीत वेळीच बदल करणे गरजेचे असल्याचे अपोलो स्पेक्ट्राचे डॉ. तुषार राणे यांनी सांगितले.

मधुमेह केवळ स्वादुपिंडावरच नाही तर यकृतावरही परिणाम करतो. स्वादुपिंड आणि यकृत हे धुमेहाच्या विकास आणि त्याच्या प्रगतीस कारणीभूत ठरतात. रक्तातील ग्लुकोज उच्च पातळी, आहाराच्या चुकीच्या सवयी आणि बराच वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने यकृत आणि स्वादुपिंडात चरबी जमा होते, ज्यामुळे यकृताची जळजळ आणि यकृतास व्रण होण्याची शक्यता वाढते. कालांतराने, यामुळे सिरोसिस होतो, हा एक असा टप्पा आहे जिथे यकृत बरे होऊ शकत नाही. २३ ते ३५ वयोगटातील ३० टक्के तरुण रक्तातील साखरेची असामान्य पातळी आणि मधुमेहाशी झुंजत आहेत. आधीच मधुमेह असलेल्या तरुणांमध्ये आणि यकृताच्या समस्यांमध्ये सुमारे १५ टक्के वाढ झाली आहे. एका महिन्यात, यकृत निकामी झालेल्या १० पैकी ३ रुग्णांना मधुमेहाचे निदान होते. तरुण मधुमेहींनी डॉक्टरांनी सुचवलेल्या उपचार आणि व्यवस्थापनाचे पालन केले पाहिजे. झायनोवा शाल्बी रूग्णालयाच्या मधुमेहतज्ज्ञ डॉ. नीता शाह म्हणाल्या.

आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश तसेच साखर आणि चरबीचे प्रमाण कमी व फळं आणि भाज्या, तृणधान्य आणि ऑलिव्ह ऑइलचा वापर केल्यास यकृताचे आरोग्य चांगले राहते. जर तुमच्या कंबरेचा घेर अधिक असेल, तर जीवनशैलीतील बदलांसह (शारीरिक हलचाल, व्यायाम) निरोगी आहाराच्या सवयींचा अवलंब करणे आणि शरीराचे वजन ५ ते १० टक्क्यांनी कमी केल्यास फॅटी लिव्हरच्या प्रमाणात घट होऊ शकते. निरोगी आहाराचे सेवन केल्यास भविष्यात यकृताचा आजार होण्याचा धोका सुमारे ५० टक्क्यांनी कमी होऊ शकतो. फॅटी लिव्हरसारखा यकृताचा रोग हा लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या वाढत्या घटनांशी संबंधित आहे, म्हणून निरोगी जीवनशैली आणि चांगल्या आहाराच्या सवयींचा अवलंब करणे गरजेचे आहे. तसेच यकृताच्या विकारांबाबत समाजात जागरुकता पसरवणे गरजेचे आहे असे हितवर्धक मंडळ कांदिवली येथील डॉ. निता सिंगी यांनी सांगितले.