यकृताशी संबंधित आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सेंट जॉर्जेस रुग्णालयात विशेष यकृत बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सेंट जॉर्जेस रुग्णालयातील विशेष यकृत विभाग १५ मार्चपर्यंत सुरू करण्याचा संकल्प रुग्णालय प्रशासनाने सोडला आहे. त्यामुळे आता यकृताच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना दिलासा मिळू शकेल. दरम्यान, सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये नुकतेच यकृत प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयांमध्येच प्रत्यारोपण शस्त्रक्रिया उपलब्ध असल्याने सर्वसामान्य रुग्णांना खर्च परवडत नाही. त्यामुळे अनेकांना उपचारांविनाच आयुष्य जगावे लागते.
हेही वाचा >>> कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; ‘या’ दिवशी होणार वाहतुकीसाठी खुला!
सरकारी रुग्णालयामध्ये प्रत्याराेपण सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकारच्या सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये अत्यल्प दरामध्ये यकृत प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र ही सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच यकृतासंदर्भातील अन्य आजारांवरही अद्ययावत उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये यकृतासंदर्भातील आजारांवर उपचार करण्यासाठी विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> मुंबईत महिलांच्या नावे घर खरेदी करणे का आहे फायद्याचं? महाराष्ट्र सरकारने नियमात काय बदल केलाय?
या बाह्यरुग्ण विभागासाठी एक शल्य विशारद, एक चिकित्सक, एक जठरांत्रमार्गाच्या रोगांचे तज्ज्ञ आणि निवासी डॉक्टरांची तुकडी नियुक्ती करण्यात आली आहे. ही तुकडी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबरोबर यकृतासंदर्भातील आजार झालेल्या रुग्णांवर उपचार करणार आहे. यकृतासंदर्भातील आजारांसाठी असलेला हा विशेष बाह्यरुग्ण विभाग १५ मार्चपर्यंत सुरू करण्याचा रुग्णालय प्रशासनाचा मानस आहे. त्यासंदर्भातील आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. हा बाह्यरुग्ण विभाग सुरू झाल्याने यकृताच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना दिलासा मिळेल, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी दिली.