मुंबई : मुंबई महापालिकेने अर्थसंकल्पात युनिव्हर्सल पदपथ धोरणाची घोषणा केलेली असली तरी कुर्ला येथील एक रस्ता पदपथाविनाच आहे. कुर्ला अंधेरी मार्गावरील एरोसिटी ते सफेद पूल पेट्रोल पंप या मार्गावर पदपथच नाही. वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्यामुळे पादचाऱ्यांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन येथून चालावे लागत आहे.
मुंबई शहरातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होते आहे. मात्र अनेक ठिकाणी पदपथांची दुर्दशा झाली आहे. मुंबईकरांना चांगले पदपथ मिळावे म्हणून मुंबई महापालिकेने युनिव्हर्सल पदपथ धोरण तयार केले आहे. पादचाऱ्यांसाठी वापरास अधिक सुलभ, पादचारी व अपंगांसाठी अनुकूल असे पदपथ तयार करण्यावर मुंबई महापालिका लक्ष केंद्रीत करणार आहे. मात्र कुर्ला – अंधेरी मार्गावर पदपथच नसल्यामुळे पादचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
याबाबत गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी पालिका प्रशासनाला पत्र पाठवले आहे. कुर्ला – अंधेरी मार्गावरील एरोसिटी ते सफेद पूल पेट्रोल पंप या कुर्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर पदपथच नाही. त्यातच या मार्गावर विविध प्राधिकरणांची कामेही सुरू आहेत. त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. वाहनांच्या गर्दीतून वाट काढत पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. सफेद पुलावर पदपथ तयार करण्याची नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी असून पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ॲड. दहिबावकर यांनी पत्रात केला आहे.
संध्याकाळी गर्दीच्या वेळी पादचाऱ्यांना या मार्गावरून चालणे मुश्कील होते. रस्त्याच्या कडेकडेने कसे तरी चालावे लागते. या ठिकाणी कुंपण किंवा कठडाही नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेने वाहने जात असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालायलाही जागा नसते. गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग यांना या रस्त्यावरून चालणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे या मार्गावर लवकरात लवकर पदपथ उभारावा, अशी मागणी ॲड.दहिबावकर यांनी केली आहे.
दरम्यान, पालिकेने युनिव्हर्सल पदपथ धोरण तयार केलेले असले तरी त्याची अद्याप अंमलबजावणी सुरू केलेली नाही. पादचाऱ्यांना अनुकूल अशा पदपथामुळे नागरिकांना चालण्यास प्रोत्साहन मिळते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य सुधारते, तसेच वाहनाने प्रवास करण्याची गरज कमी होते. वाहनांवर अवलंबून राहावे लागत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीही कमी होत असते. त्यामुळे चांगले पदपथ तयार करण्यासाठी पालिकेने हे धोरण आणले आहे. मात्र मुंबईतील अनेक ठिकाणी पदपथ असले तर त्याची दुर्दशा झालेली असते. तर काही ठिकाणी पदपथच नसतात अशी उदाहरणे आहेत.