मुंबई : राज्यात २१ व्या पशुगणनेस सोमवारपासून (२५ नोव्हेंबर) सुरुवात झाली आहे. मोबाइल अॅपचा वापर करून ही गणना होणार आहे. या पशूगणनेमध्ये जनावरांच्या जाती, उपजातींचीही नोंद होणार आहे. त्यामुळे ही पशूगणना आजवरची अद्ययावत आणि पशूधनाची सविस्तर माहिती संकलित करणारी पशूगणना असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पशुसंवर्धन आयुक्तालयातील सहसंचालक सुषमा जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २१ व्या पशुगणनेस सोमवारपासून (२५ नोव्हेंबर) सुरुवात झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत मोबाइल ॲपच्या माध्यमातून ही पशुगणना केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी पशुगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना आपल्याकडील पशूंची अचूक आणि योग्य माहिती द्यावी. पशुगणनेच्या माध्यमातून राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील कुटुंब, कौटुंबिक उपक्रम, बिगर – कौटुंबिक उपक्रम आणि संस्था, गोशाळा यांच्याकडे असलेल्या आणि राज्यात आढळणाऱ्या पशुधनाच्या १६ प्रजाती व कुक्कुट पक्षी यांची जातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा केली जाणार आहे. ही पशुगणना नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.

हेही वाचा : मुंबई : महानगरपालिकेतील लिपिक पदाची परीक्षा पुढील आठवड्यात, २ ते ६ आणि ११ ते १२ डिसेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेणार

पशुधनामध्ये महाराष्ट्र संपन्न राज्य असून, देशामध्ये सातव्या क्रमांकावर आहे. कुक्कुट पक्ष्यांच्या संख्येत पाचव्या क्रमांकावर आहे. पशुधनाच्या निरंतर विकासासाठी विविध योजना आखण्यासाठी पशुगणनास पशूंची नेमकी आकडेवारी महत्त्वाची असते. पशुपालन पूरक उत्पन्ननिर्मिती बरोबरच दूध, अंडी व मांस ही पशुधन उत्पादने पोषक आहाराचा महत्त्वाचा स्रोत आहे, त्यामुळे पशूगणना महत्त्वाची ठरते.

देशात १९१९ पासून दर पाच वर्षांनी पशुगणना होते. २०१९ मध्ये २० व्या पशुगणनेमध्ये प्रथमच प्रजाती व ग्रामीण आणि नागरी क्षेत्रनिहाय पशुधनाची आकडेवारी गोळा करण्यात आली. २० व्या पशुगणनेच्या अहवालानुसार राज्यामध्ये एकूण ३ कोटी ३० लाख ८० हजार पशुधन आहे. मागील पशुगणनेच्या तुलनेत १.८३ टक्क्यांची वाढ झाली होती. पण, देशी गोवंशाच्या संख्येत घट झाली होती.

हेही वाचा : मुंबई : महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक पदासाठी १० डिसेंबर रोजी परीक्षा

या पशूधनांची होणार गणना

शेतकरी, पशुपालकांकडील कौटुंबिक पशूधन, उद्योग, संस्था, संघटनांच्या वतीने पाळलेल्या गायवर्गीय, म्हसवर्गीय पशूंसह, मिथुन, मेंढी, शेळी, डुक्कर, घोडा, शिंगरू, खेचर, गाढव, उंट, कुत्रा, ससा, हत्ती आणि कुक्कुट पक्षी (कोंबडे-कोंबड्या, बदक, टर्की आणि इमू, क्वेल, गिनी, शहामृग) आदींसह सोळा प्रकारच्या प्राण्यांची मोजणी करण्यात येणार आहे. तसेच भटकी कुत्री, गटक्या गाई आणि प्रथमच भटका पशुपालक समुदाय (पॅस्टोरल कम्युनिटी) यांची देखील माहिती संकलित करण्यात येईल.

हे पहिल्यांदाच होणार

पशूंच्या मुख्य जातींसह उपजातींची नोंद

भटक्या समाजाकडील पशूधनाची वेगळी नोंद

गोशाळा, पांजारपोळातील गोवंशाची वेगळी नोंद

भटका गोवंश, भटक्या कुत्र्यांची भटकी म्हणून स्वंतत्र नोंद

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Livestock census maharashtra know its features mumbai print news css