वडापाव हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. दिवसाच्या कोणत्याही वेळेला पोट भरेल आणि स्वस्तात मस्त तसाच चटपटीत असा महाराष्ट्रातील आणि विशेषत: मुंबईतील स्पेशल पदार्थ. याच वडापावमध्ये मेलेल्या पालीचे पिल्लू आढळल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. अंबरनाथमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला असून हा वडापाव विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे. अंबरनाथमध्ये स्टेशन परिसरात बबन वडापाव हा नामांकित वडापाव विक्रेता आहे. त्याच्याकडे वडापाव खाण्यासाठी कायमच मोठी गर्दी असते.

जागतिक वडापाव दिनालाच हा प्रकार घडल्याने वडापाव खाणाऱ्यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी अशाप्रकारे खेळणे हा अतिशय किळसवाणा आणि धक्कादायक प्रकार आहे. अंबरनाथमध्ये नोकरी करणाऱ्या एका तरुणीने सकाळी नाष्ता करण्यासाठी स्टेशनवरुन जाताना या दुकानातून वडापाव नेले. ऑफीसमध्ये गेल्यावर हा वडापाव खात असताना तरुणीला त्यात मेलेल्या पालीचं पिल्लू आढळून आलं. ही बाब वडापाव विक्रेत्याच्या लक्षात आणून देण्यासाठी ही तरुणी पुन्हा या दुकानात गेली. मात्र येथील कर्मचाऱ्यांनी तिला अतिशय उद्धटपणे उत्तरे दिली. या तरुणीसोबत घडलेला प्रकार पाहून ग्राहकांनी तिथे एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

या घटनेनंतर अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी याठिकाणी तपासणी केली. यावेळी संबंधित दुकानाचे फूडलायसन्स संपल्याचे समोर आले. हा पाल असलेला वडापाव दुकानातील लोकांनी फेकून दिला. मात्र पालिकेचे कर्मचारी आल्यावर त्यांनी अशाप्रकारे पाल होती याची कबुली दिली. हा प्रकार काही वेळातच सगळीकडे पसरला आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे दुकान बंद करायला लावले. अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसठाण्यात याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई करतील.

Story img Loader