रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाचे साहित्य घेऊन जाणारी मालगाडी दिवा जंक्शन येथे घसरल्याने रविवारी सकाळी मध्य रेल्वेच्या उपनगरी वाहतुकीचा बोऱ्या वाजला. मेगा ब्लॉकमुळे हार्बर रेल्वे ठप्प होतीच त्यात पश्चिम रेल्वेची उपनगरी वाहतूकही दुपारी अचानक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.
सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास कल्याणहून दिवामार्गे पनवेलच्या दिशेने जाणारी मालगाडी दिवा जंक्शनजवळ घसरली. यामुळे जलद मार्गावरील दोन्ही दिशेकडील वाहतूक बंद झाली. रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक ७.३० वाजण्याच्या सुमारास सुरू झाली तर ठाण्याच्या दिशेची वाहतूक ९.३० वाजता  सुरू झाली.
या अपघातामुळे मुंबईकडे येणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, लातूर एक्स्प्रेस या गाडय़ा कल्याण रेल्वे स्थानकात रखडल्या. नंतर त्या धीम्या मार्गाने वळविण्यात आल्या. मुंबईहून जाणाऱ्या इंद्रायणी आणि डेक्कन एक्स्प्रेस या गाडय़ा विलंबाने रवाना झाल्या. मध्य रेल्वेवर सकाळी कल्याण आणि ठाणे दरम्यान धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असल्याने सकाळी लवकर बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली असतानाच पश्चिम रेल्वेवरही दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक मरीन लाइन्स आणि चर्चगेट यांच्या दरम्यान अचानक एकामागोमाग एक अशी गाडय़ांची रांग लागल्याने अवघ्या एका स्थानकाच्या प्रवासासाठी तब्बल ४० मिनिटे लागत होती. मात्र असे काहीच झाले नसल्याचे पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. सायंकाळी ५.३५ वाजण्याच्या सुमारास महालक्ष्मी ते मुंबई सेंट्रल दरम्यान गाडीखाली एक व्यक्ती आल्याने वाहतूक २० मिनिटे ठप्प झाली होती. यामुळे गाडय़ा विलंबाने धावत होत्या. गोरेगाव आणि बोरिवली दरम्यान जम्बो ब्लॉक करण्यात आल्याने उपनगरी वाहतूक अगोदरच विस्कळीत होती, त्यातच या घटनांमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक दिवसभर पूर्णपणे विस्कळीत झाली होती. हार्बर मार्गावरही कुर्ला ते मानखुर्द दरम्यान मेगा ब्लॉक करणयात आल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना बेस्ट बस तसेच रिक्षांचा आधार घ्यावा लागला. यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर चेंबूर ते गोवंडी दरम्यान वाहतूक कोंडी झाली होती.    

Story img Loader