विधान परिषदेत हुसेन दलवाई यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत आपल्यालाच उमेदवारी मिळावी, असा आग्रह अल्पसंख्याक समाजाच्या पक्षातील नेत्यांनी धरला आहे. दुसरीकडे गेल्या वेळी संधी नाकारण्यात आल्याने यंदा विचार व्हावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांचे साताऱ्यातील समर्थक करीत आहेत.
दलवाई यांची राज्यसभेवर निवड झाल्याने त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या जागेसाठी पोटनिवडणूक होत असल्याने या जागेवर अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी द्यावी, अशी पक्षातून मागणी होत आहे. दलवाई यांना विधान परिषदेकरिता अल्पसंख्यांक कोटय़ातून उमेदवारी मिळाली होती, असा त्यासाठी युक्तिवाद करण्यात येत आहे. या पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून माजी आमदार खतीबउद्दिन नकवी यांनी अलीकडेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. वादग्रस्त माजी मंत्री अनिस अहमद आणि माजी आमदार मुझ्झफर हुसेन हे सुद्धा उमेदवारीकरिता जोरदार लॉबिंग करीत आहेत. विशेष म्हणजे दोघेही विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. अनिस अहमद हे अ. भा. काँग्रेस समितीचे सचिव असून, त्यांचे दिल्लीत चांगले लागेबांधे आहेत. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या काँग्रेसला सत्ता मिळालेल्या दोन्ही राज्यांची सचिव म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री चव्हाण यांनी साताऱ्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला होता. सातारा व परिसरात पक्षाची ताकद वाढण्याकरिता पाटील यांना आमदारकी दिल्यास पक्षाला फायदा होईल, असा मुख्यमंत्र्यांचा युक्तिवाद होता. पण तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातून पुण्याचे शरद रणपिसे यांनी संधी मिळाली. यंदा तरी साताऱ्याला प्रतिनिधीत्व मिळावे, अशी साताऱ्यातील मुख्यमंत्री समर्थकांची मागणी आहे. दिल्लीतीलही काहीजण या जागेसाठी इच्छुक आहेत. प्रत्येक जण आपापल्या ‘गॉडफादर’च्या माध्यमातून उमेदवारीकरिता प्रयत्न करीत आहेत. राज्यसभेकरिता रजनी पाटील यांना संधी देण्यात आल्याने महिला आणि मराठा या दोन्ही घटकांचा विचार होणार नाही. मुंबईतील काही नेतेमंडळीही उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा