शेजारील छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनी देशातील राजकीय वातावरण तापवले असताना महाराष्ट्रात एक नगरपंचायत, तीन नगरपरिषदा, तीन जिल्हा परिषदा आणि दोन महापालिकांमध्ये निवडणुकीचा बार उडणार आहे. अहमदनगर आणि धुळे महानगरपालिकाच्या निवडणुका येत्या १५ डिसेंबरला तर धुळे, नंदूरबार व अकोला जिल्हा परिषदेच्या व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या निवडणुका १ डिसेंबरला होणार आहेत.
राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी बुधवारी या निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. अहमदनगर व धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता तसेच सोलापूर आणि लातूर महानगरपालिकांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीकरिता १९ ते २६ नोव्हेंबर दरम्यान नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. या ठिकाणी २९ नोव्हेंबपर्यंत उमेदवारी मागे घेण्यात येणार असून १५ डिसेंबरला मतदान तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ डिसेंबरला मतमोजणी होईल.
नागपूर जिल्ह्यातील नवनिर्मित मौदा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक तसेच इचलकरंजी, गंगापूर व उस्मानाबाद या तीन नगरपरिषदांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता १५ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील. उमेदवारी मागे घ्यावयाचा अंतिम दिनांक अपिल नसेल तेथे २ डिसेंबर व अपिल असेल तेथे अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी असा असेल. या ठिकाणी १५ डिसेंबरला मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी मतमोजणी होईल.
धुळे, नंदूरबार व अकोला या जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता ११ ते १६ नोव्हेंबर दरम्यान नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख जेथे अपिल नाही तेथे २३ नोव्हेंबर व जेथे अपिल आहे तेथे २७ नोव्हेंबर अशी असून १ डिसेंबरला मतदान तर २ डिसेंबरला मतमोजणी होईल. सार्वत्रिक निवडणुका असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संपूर्ण क्षेत्रात तर पोटनिवडणुका असलेल्या ठिकाणी संबंधित प्रभागामध्ये आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होईल, असे निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीतच झुंज धुळे जिल्हा परिषद सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. धुळे महापालिकेत त्रिशंकू अवस्था आहे. म्हणजे, अवघ्या तीन संख्याबळाच्या बळावर भाजपने महापौरपद पटकावले तर विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे आहे. संख्याबळानुसार पहिल्या क्रमांकाचा पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्थायी समितीचे सभापतीपद आहे. आगामी निवडणुकीत बहुमत कोणाही एकाच्या पारडय़ात न पडल्यास पुन्हा अशीच स्थिती निर्माण होऊ शकते. या ठिकाणी लोकसंग्राम पक्षही आघाडी व युतीप्रमाणे प्रमुख दावेदार आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्हय़ाची जिल्हा परिषद मात्र राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. या ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे सध्या ३२ तर विरोधी काँग्रेसचे १६ सदस्य आहेत. भाजप, सेना व माकप यांचे अस्तित्व केवळ नावापुरतेच आहे. या निवडणुकीवर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची समीकरणे निश्चित होणार असल्याने ही जिल्हा परिषद राखण्यात राष्ट्रवादी पुन्हा यशस्वी होते की, काँग्रेस बाजी मारते यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांचा बार उडणार!
महाराष्ट्रात एक नगरपंचायत, तीन नगरपरिषदा, तीन जिल्हा परिषदा आणि दोन महापालिकांमध्ये निवडणुकीचा बार उडणार आहे.
आणखी वाचा
First published on: 07-11-2013 at 05:33 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local body polls zp corporation polls in december