सोमवार सकाळपासून पडत असलेल्या सततधार पावसाचा फटका मध्य रेल्वेच्या उपनगरीय वेळापत्रकाला बसला. सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या आणि सुटणाऱ्या जलद आणि धीम्या लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे लोकल गाड्यांना प्रवाशांची गर्दी झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्ध्याहून अधिक जून महिन्यात पावसाने पाठ फिरवलेली असतानाच सोमवार सकाळपासून मात्र संततधार सुरु आहे. याचा परिणाम मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकावर झाल्याचे दिसते. सकाळी साधारण दहापासून सीएसएमटीच्या दिशेने आणि कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत. सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल २० मिनिटे आणि कल्याण, खोपोलीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल पंधरा मिनिटे विलंबाने आहेत.

स्थानकातील इंडिकेटरवर लोकल विलंबाने धावत असल्याचे दिसत असल्याने जलद किंवा धीम्या लोकल पकडून पुढील प्रवास करण्यासाठी गर्दी होत आहे. विस्कळीत झालेल्या वेळापत्रकाचा फटका वातानुकूलित लोकल गाड्यांनाही बसला आहे. त्यामुळे वातानुकूलित लोकलचे तिकीट किंवा पास काढूनही सामान्य लोकलमधून प्रवास करावा लागत आहे. यासंदर्भात मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्याशी संपर्क साधला असता कल्याण जवळ एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल उशिराने धावत असल्याचे त्यांनी सांगितले.