मुंबई : रेल्वेमध्ये दररोज अपघातांची मालिका सुरूच असून प्रवाशांचा प्रवास असुरक्षित होऊ लागला आहे. रविवार सकाळी अंबरनाथ येथे डाऊन दिशेकडे जाणाऱ्या लोकलचा एक डबा रुळावरून घसरला. परिणामी कल्याण-कर्जत दिशेकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. तर, डाऊन कल्याण ते बदलापूर विभागात ब्लॉक घेण्यात आला असून अप दिशेकडील कर्जत-कल्याण विभाग सुरू आहे. दरम्यान, लोकल रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
रविवारी सकाळी ८.२५ वाजता अंबरनाथ येथे रिकाम्या लोकलच्या एका डब्याचे एक चाक साइडिंगमध्ये रुळावरून घसरले. घटनेची माहिती संबंधित रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळताच, घटनास्थळी कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर लोकलचे चाक रुळावर आणण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या घटनेमुळे कल्याण ते कर्जत दरम्यानच्या लोकल सेवेचे वेळापत्रक बिघडले आहे. तसेच डाऊन एलटीटी – विशाखापट्टणमला अंबरनाथ येथे थांबून ठेवले आहे. तसेच एक डाऊन बदलापूर आणि अंबरनाथ लोकलला उल्हासनगर येथे थांबविले आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला पडलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. लोकल घसरण्याच्या घटनेमुळे त्याचे फिरायचे नियोजन पूर्णपणे बिघडले आहे.