सुशांत मोरे
लोकल, लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वक्तशीरपणात घट; वाहतूक १५-२० मिनिटे विलंबानेच
‘रोज मरे त्याला कोण रडे’ ही म्हण मध्य रेल्वेच्या उपनगरीय वाहतुकीला तंतोतंत लागू पडत आहे. वक्तशीरपणात नेहमीच मागे राहिलेल्या मध्य रेल्वेच्या लोकल सेवेचा वक्तशीरपणा मार्च महिन्याच्या तुलनेत कमी झाला आहे. एकीकडे लांब पल्ल्याच्या गाडय़ांना मार्ग करून देण्याच्या प्रयत्नात लोकलची वाहतूक ठिकठिकाणी रोखावी लागत असताना, दुसरीकडे लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वक्तशीरपणाचा आलेख ७० टक्क्यांवर घसरला आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) दिशेने येणाऱ्या लोकलगाडय़ा दररोज सरासरी १५-२० मिनिटे विलंबाने धावत असल्याचे समोर येत आहे.
मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या गर्दीचा ताण आणि मागणी पाहून किमान ९० टक्के वेळापत्रकानुसार लोकल धावायला हव्यात, अशी तंबी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात रेल्वे प्रशासनाला दिली होती. त्या वेळी रेल्वेच्या वक्तशीरपणाची सरासरी वेळापत्रकाच्या ७५ टक्क्यांच्या आसपास होती. गोयल यांच्या आदेशानंतर रेल्वे प्रशासनाने हरतऱ्हेने प्रयत्न करत या वर्षी मार्च महिन्यापर्यंत जलद व धिम्या लोकल गाडय़ांच्या वक्तशीरपणाचा आलेख ९३ टक्क्यांपर्यंत नेला. परंतु आता तो पुन्हा घसरणीला लागला असून सध्या ८५ ते ९० टक्के फेऱ्याच वेळापत्रकानुसार चालवणे शक्य होत आहे.
मध्य रेल्वेवर सध्याच्या घडीला दररोज १७०० पेक्षा अधिक लोकल फेऱ्या तर २१० मेल-एक्स्प्रेस गाडय़ांची वाहतूक होत असते. त्यातच सुट्टीकालीन विशेष गाडय़ा सोडाव्या लागल्या की मध्य रेल्वेला वेळापत्रक पाळताना कसरत करावी लागते. सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत मुंबईत प्रवेश करणाऱ्या पंजाब मेल, अमरावती एक्स्प्रेस, हावडा, विदर्भ, देवगिरी, नंदीग्राम एक्स्प्रेस गाडय़ा पंधरा ते वीस मिनिटे उशिराने येत असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. मेल-एक्स्प्रेस गाडय़ांना मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी लोकल गाडय़ांना थांबवून ठेवावे लागते. त्याचा फटका लोकल गाडय़ांना बसतो. सायंकाळी सहानंतरही हीच परिस्थिती मध्य रेल्वेवरील अप व डाऊनला जाणाऱ्या जलद मार्गावर दिसून येते. परिणामी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) दिशेने जाणाऱ्या लोकल गाडय़ा पंधरा मिनिटे ते अर्धा तास उशिराने धावत आहेत. याचा फटका थेट रेल्वे प्रवाशांना बसत आहे. दुसरीकडे, मुंबई विभागातील मेल-एक्स्प्रेसचा वक्तशीरपणाचा आलेखही घसरून ७० टक्क्यांवर आला आहे.
विलंबाने धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाडय़ांमुळे लोकल गाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम होत असल्याचे रेल्वेला मान्य नाही. मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अनिल कुमार जैन यांच्या म्हणण्याप्रमाणे रेल्वे फाटकांमुळे जलद आणि धिम्या लोकलचे वेळापत्रक बिघडते. दिवा व कळवा येथील रेल्वे फाटक दिवसभरात बराच वेळ उघड-बंद होत असते. कळवा येथील फाटक दिवसभरात ३० वेळा, तर दिवा येथील फाटक २० वेळा उघड-बंद होत असल्याने गाडय़ांना विलंब होतो, असा रेल्वे अधिकाऱ्यांचा दावा आहे.
तांत्रिक कारणांची भर
* उशिराने येणाऱ्या मेल- एक्स्प्रेस गाडय़ांबरोबरच रेल्वे फाटक, रूळ ओलांडताना होणारे अपघात, ओव्हरेड वायर आणि सिग्नल बिघाडामुळेही लोकल गाडय़ांना फटका बसतो.
* दिवा व कळवा येथील फाटक दिवसभरातून बराच वेळ उघडते व बंद होत असते. त्यामुळे जलद व धिम्या लोकल फेऱ्यांवर परिणाम होतो.
* सुट्टीमुळे एक्स्प्रेस गाडय़ांना मोठी गर्दी असते. या काळात साखळी खेचण्याचेही प्रकार वाढतात.
* मंगळवारी वेगवेगळ्या सहा एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये साखळी खेचण्यात आल्याने गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडले.