मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकल प्रवासात कर्कश्श आवाजात जाहिराती वाजत असल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. लोकलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वच्छतेबाबतची जाहिरात वाजवली जात असून त्या जाहिरातीसह मोठ्या आवाजात वाजणाऱ्या जाहिरातींचा त्रास होत असून त्या बंद करण्याची विनंती प्रवाशांनी केली आहे. त्याची दखल घेऊन मध्य रेल्वेलाही मोदीजींची जाहिरात बंद करण्यासाठी पाऊल उचलावे लागले आहे.
प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि आरामदायी होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध सुविधा पुरवल्या जातात. मात्र, मध्य रेल्वे उत्पन्न वाढीसाठी लोकलमध्ये उद्घोषणेद्वारे जाहिराती वाजविल्या जातात. मात्र, या जाहिरातींमुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. मुळातच गर्दीचा कोलाहल, गाड्यांचा आवाज यांत मोठ्या आवाजातील जाहिरातींची भर पडली आहे. जाहिरातींच्या आवाजाचा त्रास होत असल्याबाबत प्रवाशांनी मध्य रेल्वेकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. जाहिराती बंद करण्यात याव्यात किंवा किमान त्यांचा आवाज कमी करण्यात यावा अशी विनंतीही अनेकदा प्रवाशांनी केली आहे. मात्र, त्यावर ठोस उपाययोजना नाहीच पण तक्रारींचा दखलही घेण्यात येत नसल्याने प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. नुकतीच एका प्रवाशाने समाज माध्यमांवर मोदीजींच्या आवाजातील स्वच्छतेबाबतची जाहिरात बंद करावी अशी विनंती केली. त्यानंतर मात्र मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाने या तक्रारीची दखल घेतली. त्यानंतर लवकरच लोकल ज्या कारशेडमध्ये जाते. तेथे लोकलच्या उद्घोषणेत बदल केला जाईल, असे मध्य रेल्वेने नमूद केले.
हेही वाचा : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे योगदान हे महापालिकेच्या अर्थसंकल्पापेक्षा भरीव; उच्च न्यायालयाची टिप्पणी
विविध जाहिराती, चित्रपट, टीव्ही मालिकेच्या जाहिराती लोकलमध्ये लावण्यासाठी मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाने कंत्राटदाराला पाच वर्षांसाठी कंत्राट दिले आहे. या कंत्राटाद्वारे मध्य रेल्वेच्या १३४ लोकल रेकमध्ये जाहिरात वाजवण्यात येत आहेत. याद्वारे मध्य रेल्वेला पाच वर्षांसाठी १.७ कोटी रुपये मिळाले आहे.
ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाची जाहिरात अजूनही वाजवण्यात येते. त्यामुळे मध्य रेल्वेचे जाहिरातींवर नियंत्रण नसल्याचे दिसते. तसेच जाहिराती खूप मोठ्या आवाजात वाजत असतात. सकाळी प्रवास करताना झोपमोड होते, असे प्रवासी अमर उबाळे यांनी सांगितले.
हेही वाचा : सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्त्यावरील तीन पुलांची संरचनात्मक तपासणी होणार, बारा वर्षातच संरचनात्मक तपासणीची वेळ
मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये मोठ्या आवाजात वाजवल्या जाणाऱया जाहिरातींमुळे गरोदर महिला, लहान मुले, वृद्ध प्रवाशांना नाहक त्रास होतो. तसेच पुस्तक, वर्तमानपत्रे वाचणाऱ्या प्रवाशांना जाहिरातींचा व्यत्यय होतो, असे प्रवासी प्रदीप पाटील यांनी सांगितले.