मुंबई : महानगरपालिकेत गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पालिकेच्या एफ उत्तर विभागात नुकतेच काही आठवड्यांपूर्वी सहाय्यक आयुक्तपदी नियुक्त झालेले तसेच, प्रशासकीय नोकरीचा पहिलाच अनुभव असलेले नितीन शुक्ला यांचीही त्यावेळी बदली करण्यात आली. मात्र, शुक्ला यांच्या बदलीबाबत स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. शुक्ला यांच्या अचानक तडकाफडकी बदलीच्या निर्णयाविरोधात मंगळवारी सकाळी एफ उत्तर विभाग कार्यालयासमोर रहिवाशांनी काळ्या फिती बांधून निदर्शने केली.

मुंबई महापालिकेत बऱ्याच काळानंतर २८ फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणात खांदेपालट करण्यात आली. त्यावेळी सात उपायुक्त, तसेच एकूण बारा सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात शुक्ला यांचाही समावेश होता. लोकसेवा आयोगाकडून नितीन शुक्ला यांची फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पालिकेच्या एफ उत्तर विभागात सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यांच्या बदलीनंतर माटुंगा परिसरातील पदपथ गिळंकृत केलेल्या अनधिकृत दुकानांवर मोठ्या प्रमाणात तोडक कारवाई झाली.

सलग दोन दिवस निष्कासनाची मोहीम राबवून पदपथ मोकळे केल्यामुळे स्थानिकांमध्ये शुक्ला यांच्या कामकाजाबाबत सकारात्मक चर्चा होऊ लागली. मात्र, काहीच आठवड्यात महापालिकेत झालेल्या बदल्यांमध्ये शुक्ला यांचा समावेश करण्यात आला. शुक्ला यांनी पालिकेच्या बी विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी बदली करण्यात आली. या प्रशासकीय निर्णयाला स्थानिक रहिवाशांना विरोध दर्शवत महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडेही विचारणा केली. तडकाफडकी बदलीमुळे शुक्ला यांच्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाल्याने रहिवाशांनी मंगळवारी सकाळी एफ उत्तर विभाग कार्यालयासमोर निदर्शने केली.

हाताला काळ्या फिती बांधून प्रशासकीय बदलीबाबत त्यांनी विरोध दर्शविला. सुमारे २०० ते २५० रहिवासी या निदर्शनात सहभागी झाले होते. त्यावेळी नितीन शुक्ला यांची पुन्हा एफ उत्तर विभागात पुनर्नियुक्ती करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही विचारणा करण्यात येणार असल्याचे रहिवाशांनी सांगितले. या निदर्शनाला म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनही पाठिंबा दिला.

अयोग्य व नियमबाह्य कारवाईचा रवी राजा यांचा आरोप

रहिवाशांच्या निदर्शनानंतर महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी शुक्ला यांच्या बदलीला एक्स समाजमाध्यमावरून समर्थन दिले. मुंबईत अनेक सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. एफ उत्तर विभागात झालेल्या बदलीचे स्वागत करत करतो. कुठलीही संस्था ही सर्वोच्च असते आणि ती असायलाच हवी. मात्र, संस्थेपेक्षा स्वतःला मोठे समजणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे स्पष्ट मत रवी राजा यांनी व्यक्त केले. एफ उत्तर विभागातील अधिकारी चुकीच्या तक्रारींच्या आधारे अयोग्य आणि नियमबाह्य कारवाई करत होते, असाही आरोप रवी राजा यांनी केला. गरिबांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याची बदली झाली हे चांगलं झाले. एफ उत्तर विभागात अनेक ठिकाणी इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे, पण तिकडे भेट देऊन नागरिकांना होणारा त्रास जाणून घेण्याऐवजी सामान्य आणि गरीबांवर कारवाई केली जात होती. हे सगळे आता थांबेल अशी आशा व्यक्त करतो, असेही त्यांनी नमूद केले.