इमारतींमधील सांडपाणी तलावात सोडले जात असल्याचे पालिकेचे म्हणणे
मुंबईचे नैसर्गिक वैभव समजल्या जाणाऱ्या पवई तलावात सांडपाणी सोडून तो प्रदूषित केला जात असल्याची तक्रार करणारे स्थानिक नागरिकच आता आरोपीच्या पिंजऱ्यात अडकले आहेत. या परिसरातील इमारतींमधील सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना तलावात सोडण्यात येत असल्याचे पालिकेने म्हटले असून या प्रकरणी संबंधित इमारतींवर कारवाई करण्याचे संकेतही दिले आहेत. त्यामुळे आतापर्यंत तलाव प्रदूषणाबाबत आवाज उठवणाऱ्या स्थानिकांनाच आता या प्रश्नी स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
पवई तलावाच्या परिसरात अनेक टोलेजंग गृहसंकुले आहेत. २० हजार चौरस फुटांहून अधिक क्षेत्रफळ असलेल्या इमारतींना स्वत:चे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारून त्यातून प्रक्रिया केलेले पाणी बाहेर सोडणे आवश्यक आहे. जेव्हीएल रस्ता, हिरानंदानी या भागातील काही इमारतींमधून तलावात सांडपाणी सोडण्यात येते. ‘या इमारतींनी प्रक्रिया केंद्र उभारले असले तरी ते चालवीत नाही. म्हणून या इमारतींवर कारवाई करण्यात यावी असे ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ला कळविण्यात येणार आहे,’ असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले.
पवई तलावात गेल्या चार महिन्यांपासून एका नादुरुस्त मलनिस्सारण वाहिनीचे पाणी जात आहे. त्यामुळे येथील जैवविविधताही धोक्यात आल्याचा आरोप करीत ‘पॉझ’ या पर्यावरणवादी संस्थेचे सुनीश कुंजू यांनी पालिकेकडे तक्रार केली होती. कुंजू यांनी येथील रहिवाशांना एकत्र करून ‘सेव्ह पवई लेक’ या नावाची मोहीमच या भागात सुरू केली आहे. त्याची दखल न घेतल्याने त्यांनी मुख्यमंत्री आणि केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडेही लेखी तक्रार करीत या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यामुळे पवई तलावच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला. मात्र केवळ एकाच वाहिनीतून नव्हे तर तलावाच्या सभोवताली असलेल्या १२ वाहिन्यांमधूनही येथे सांडपाणी सोडले जाते, असे पालिकेचे म्हणणे आहे.
मात्र, इतके दिवस या इमारती विनाप्रक्रियाच सांडपाणी सोडत होत्या. तेव्हा पालिका काय करीत होती, असा सवाल स्थानिक रहिवासी उपस्थित करीत आहेत. या प्रश्नावरून पालिकेचा मलनिस्सारण विभाग व प्रभाग कार्यालय यातही समन्वय नसल्याने ही समस्या वाढीस लागली आहे. गेल्या दशकभरात या तलावावर अंदाजे ५० कोटींचा खर्चही पालिकेने केला. तर, मग हे पैसे खर्च झाले कुठे, असा सवालही उपस्थित होत आहे. दरम्यान, याबाबत तक्रार करूनही
पालिका दखल घेत नसल्याने आम्ही मुख्यमंत्री व केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे. असे ‘सेव्ह पवई लेक’ अभियानाच्या सुनीश कुंजू यांनी सांगितले.
पवई तलाव परिसराचा अभ्यास करण्यासाठी एका सल्लागाराची नेमणूक करणार असून यासाठीची निविदा प्रक्रिया झाली आहे. याद्वारे सुशोभीकरण, पर्यटकांना सुविधा, येथे येणाऱ्या सांडपाण्याचा निचरा कसा करता येईल आदींचा आढावा घेण्यात येईल.
– डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त महापालिका