मुंबई : मध्य रेल्वेवरील उपनगरीय रेल्वे सेवा दररोज बहुविध कारणांनी उशिराने धावते. मध्य रेल्वे प्रशासन उदघोषणेद्वारे दिलगिरी व्यक्त करून विलंबाच्या खोल जखमेवर तात्पुरती मलमपट्टी केली जाते. समाज माध्यमांवर प्रवाशांच्या विलंबाच्या तक्रारीवर मध्य रेल्वेकडून समांतर रस्ता फाटकामुळे (लेव्हल क्राॅसिंग गेट) लोकल सेवा उशिराने धावत असल्याचे सांगण्यात येते. चालू आर्थिक वर्षात जानेवारी २०२५ पर्यंत मध्य रेल्वेवर रेल्वे फाटकामुळे सुमारे २,५०० वेळा वेळा लोकलचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे जादा वेळ खुले राहिलेल्या रेल्वे फाटकाचा त्रास प्रवाशांच्या पाचवीला पुजलेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात पूर्व-पश्चिम रस्ता जोडण्यासाठी रेल्वे मार्गावर फाटक आहेत. त्यातून दररोज हजारोंच्या संख्येने वाहनांची ये-जा होते. यावेळी रेल्वे गाड्यांची वाहतूक सुरळीत राहण्यासाठी योग्यवेळी फाटक बंद-खुले केले जाते. परंतु, फाटक बंद करण्यास अथवा खुले करण्यास दिरंगाई झाली की वाहनांची कोंडी अथवा रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते कल्याणदरम्यान दिवा येथे रेल्वे फाटक आहे. त्या फाटकामुळे प्रवाशांचा खोळंबा होतो. दिवा येथील रेल्वे फाटक खुले राहिल्याने फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सुमारे १० लोकल रद्द करण्यात आल्या आणि १५ हून अधिक लोकल विलंबाने धावल्या. रोज रेल्वे फाटक अधिक वेळ खुले राहिल्याने लोकल रद्द होतात तर काही उशीरा धावतात, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत १,५०० वेळा रेल्वे फाटक अधिकवेळ उघडे राहिल्याचा फटका लोकल सेवाला बसला. तर, ऑगस्ट २०२४ ते जानेवारी २०२५ मध्ये हा आकडा १,७०० वर पोहचला. या दोन्ही कालावधीच्या तुलनेत गेल्या सहा महिन्यात रेल्वे फाटकामुळे लोकलचा खोळंबा होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचण्यास उशीर होतो. बहुसंख्य नोकरदार वर्गाला कार्यालयात वेळेत पोहोचता येत नसल्याने कारवाईला सामोरे जावे लागते. मात्र घरातून लवकर निघूनही रेल्वेच्या कारभामुळे नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत.

दररोज लोकल सेवा उशिराने धावते. प्रत्येक लोकल १५ ते २० मिनिटे उशीर होत असल्याने कार्यालयात जाण्यास विलंब होतो. तसेच, अनेक प्रवाशांचे पुढील प्रवासाचे नियोजन चुकते. – नितेश लाड, प्रवासी